भुसावळात मोकाट कुत्र्यांचा कहर; ९ वर्षीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, ८० टाके पडले —नगरपरिषदेच्या सुस्त प्रशासनावर नागरिकांचा संताप
मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

भुसावळ | २४ एप्रिल २०२६ | भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता थेट नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नारायण नगर परिसरात पहाटे शाळेसाठी घराबाहेर पडलेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला तब्बल ८० टाके पडले आहेत. जखमी विद्यार्थी तारकेश विशाल झोपे याच्यावर सध्या जळगाव येथील शिल्प हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मुलाला प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे १.५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विशाल झोपे यांनी दिली आहे. या घटनेमुळे मुलासह संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरातील पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार तक्रारी, पण कारवाई शून्य
स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत यापूर्वीही अनेकदा नगरपरिषदेला तक्रारी देण्यात आल्या होत्या; मात्र कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. उलट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांचे वर्तन अधिक आक्रमक बनत चालले आहे.
भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, गणेश कॉलनीसह शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याचे चित्र आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीस्वार यांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात गणेश कॉलनीत एका वृद्धालाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर?
दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र भुसावळ नगरपरिषदेकडून त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली दिसत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील अस्वच्छता, वाढती घाण आणि कचऱ्याचे ढीग यामुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे रेबिजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका अधिक गंभीर बनला आहे.नागरिकांकडून यापूर्वीच नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते; तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे. “नगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप स्थानिकांनी केला.
नागरिकांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—
आक्रमक मोकाट कुत्र्यांना तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे
नियमित श्वान नसबंदी मोहिमा राबवाव्यात
पाळीव प्राण्यांच्या मालकांनी लसीकरण व नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
या निवेदनावर विलास कोळी, दशरथ सपकाळे, दिपक आत्माराम सोनवणे यांच्यासह रेखा फिरके, धनश्री लढे, दीपाली शिरसागर, संगीता सरोदे, रूपाली पाटील, ललिता पाटील, निर्मला गायकवाड आणि सोनाली महिंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मात्र या गंभीर प्रकरणावर भुसावळ नगरपरिषदेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, ही बाब नागरिकांच्या रोषात अधिक भर घालत आहे.








