प्रख्यात पार्श्वगायिका आणि समाजसेविका अनुराधा पौडवाल राजकारणात
एकेकाळी गायन क्षेत्रात खूप होता दबदबा
मुंबई दि-१६, जगप्रसिद्ध महान पार्श्वगायिका असलेल्या आणि १९८०-९० चे दशक आपल्या अभिजात पार्श्वगायनाने आणि सुमधुर भक्तीसंगीताने कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या तसेच लता मंगेशकर व इतर समकालीन गायिकांचे सिंहासन हलविणाऱ्या जेष्ठ समाजसेविका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केलेला आहे. आज दुपारी त्यांनी भाजप कार्यालय गाठून पक्षात प्रवेश केला. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होत असताना अनुराधा पौडवाल भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. निवडणूक आयोग आजच काही राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, आज मी अशा लोकांमध्ये सामील होत आहे ज्यांचे सनातनशी घट्ट नाते आहे. चित्रपटसृष्टीत गाल्यानंतर मी भक्तीगीतेही गायली आहेत. रामललाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे गाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे.
कोण आहेत अनुराधा पौडवाल?
अनुराधा पौडवाल एक लोकप्रिय पार्श्वगायिका आहे. 90 च्या दशकात ती त्यांच्या भक्ती गायनामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्यांचे वय सध्या 69 वर्षे आहे. 1969 मध्ये तिचे लग्न अरुण पौडवाल यांच्याशी झाले होते, जे एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. त्यांना दोन मुले आहेत, मुलगा आदित्य आणि एक मुलगी कविता. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. अनुराधा पौडवाल यांच्या पतीचे 1991 मध्ये निधन झाले.
गेल्या २५ वर्षांपासून अनुराधा पौडवाल या त्यांच्या सेवाभावी फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ व अपंग बालकांच्या समाजकार्यात नेहमी सक्रिय असतात. कोरोना काळात त्यांच्या फाउंडेशनने लक्षवेधी कामगिरी केलेली होती. त्यांच्या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनिसेफने घेतली होती.
मुंबईतून लोकसभा लढवणार ?
अनुराधा पौडवाल या जन्मापासूनच मुंबईत राहत असून त्यांना भाजपच्या मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.