मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात खळबळ; एका व्यक्तीने इमारतीवरून खाली मारली उडी
यापूर्वीही अनेकांनी मारलेल्या आहेत उड्या
मुंबई दि-६ जून, देशासह राज्यातील अनेक ठिकाणचे लोकसभा निवडणुकांचे धक्कादायक निकाल समोर आलेले आहेत. कुठे कोणी बाजी मारली आणि कुठे कोणाचा पराभव झाला आता याचा सर्वत्र चर्चा सध्या पहायला मिळत आहे. विजयी झालेल्या मतदारसंघात जल्लोष, गुलाल उधळला जात आहे तर पराभव झालेले उमेदवार नाराज आहेत. त्यामुळे सर्वत्र निवडणुकीच्या निकालाचे वेगवेगळे पडसाद उमटलेले दिसत आहे. अशातच आज दुपारी मंत्रालयातून खळबळ उडवणारी घटना समोर आली. एकीकडे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत संघटना मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदावरून मला वरिष्ठांनी मोकळे करण्याची मागणी केलेली असून आज ते नागपूरहून थेट विमानाने दिल्लीला रवाना झालेले आहेत. त्यामुळे ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा उपस्थित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आता दिल्लीत काय घडामोडी होतात, याच्याकडे राज्यातील राजकारणी नेत्यांसह जनतेच्या नजरा लागलेल्या असतानाच मंत्रालयात आज मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे.
आज मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका व्यक्तीनं जाळीवर उडी मारली. या घटनेनं खळबळ उडाली असून हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि त्यानं उडी का मारली ? याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या हातात काही कागदपत्रे आढळून आलेली आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे. त्या व्यक्तीनं असं का केलं ? यामागे त्याचा काय उद्देश होता? हे अद्याप समोर आलेलं नाही. यापूर्वीही अनेकदा या ठिकाणी अनेकांनी उडी मारून आंदोलन आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आलेले आहेत.