जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्यमंत्रीमंडळ विस्तारासह महामंडळाच्या रिक्त अध्यक्षपदांसाठी यांची वर्णी लागण्याची चर्चा

मुंबई, दिनांक १६ जून २०२४, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसलेल्या जबर फटक्यानंतर पावसाळी अधिवेशनापूर्वी शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यातून काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, तर काहींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंत्री गिरीश महाजन यांना यामध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना महसूल मंत्रीपद देण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार नितेश राणे यांना सुद्धा राज्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.भाजपने आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावर लक्ष केंद्रित केलेलं असून लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीची समिक्षा करून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी त्यादृष्टीने व्यूहरचना आणि रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातं असून राज्यमंत्रीमंडळाचा होणारा विस्तार आणि महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून काही महत्त्वाच्या महामंडळाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. भाजपच्या कोट्यातून त्यामध्ये आता काही जणांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू करण्यात आलेली असून महत्त्वाच्या असलेल्या आठ ते दहा महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी येत्या आठवड्यात निकटवर्तीय आमदारांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या महामंडळांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक असलेले भाजपचे जळगावचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगांवचे आमदार मंगेष चव्हाण आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना यापूर्वी राज्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. महामंडळाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद हे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे गणले जाते. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या मर्जीतील कोणत्या आमदाराची या ठिकाणी वर्णी लागते याची आता जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झालेली आहे.
या महामंडळांची चर्चा
जळगाव जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास नव्याने स्थापन झालेल्या केळी विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळामध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदांमध्ये फेरबदल अथवा नियुक्ती होण्याची चर्चा सुरू झालेली आहे.जळगाव जिल्ह्यात हल्ली राज्यशासनाचे तीन कॅबिनेट मंत्री असून आता नव्याने खासदारपदी निवडून आलेल्या रक्षा खडसे यांची नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. असे एकूण चार मंत्रिपदे जिल्ह्याला लाभलेली असताना आता महामंडळाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदाच्या रूपाने पाचवे राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे पद जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button