वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा ”प्रशिक्षणार्थी खेळ” थांबला, चौकशीचे आदेशपत्र निघाले
IAS puja khedkar | मुंबई दि- 16 जुलै, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी तथा वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत मोठी माहिती समोर आली असून त्यांना मोठा दणका बसला आहे. आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र सरकारच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीने त्यांच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रशिक्षणार्थी कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्यात आलेला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना परत बोलवून घेण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाने तसे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवले असून, राज्य सरकारने प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करत त्यांना मुक्त केले आहे.पूजा खेडकर यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे आणि त्यांना अकादमीमध्ये हजर होण्यास सांगावे, असे या पत्रात म्हटले आहे.पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आला आहे, अशाप्रकारची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. पुढच्या कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करा. 23 जुलैपूर्वी मसुरीमध्ये हजर राहावं लागेल, असे आदेश डीओपीटीने पूजा खेडकर यांना दिले आहेत. राज्य सरकारने 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली आहे. बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि बनावट नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून, याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतलेली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेत असतानाच आयएएस पूजा खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कॅबिन बळकावली होती. तसेच स्वतःच्या ऑडी या आलिशान गाडीवर अनधिकृतपणे लाल दिवा बसवून चर्चेत आलेल्या होत्या. त्याचबरोबर प्रशिक्षण कालावधीतच अनेक गोष्टींची मागणी केली होती, ज्या नियमानुसार चुकीच्या होत्या. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना 25 पानांचा अहवाल पाठवला होता. हा अहवाल लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीकडे पाठवण्यात आला होता. त्यामुळे आता पूजा खेडकर यांची सखोल चौकशी होणार असून त्यांनी तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीला हजर न राहता काही ना काही कारण सांगून वेळ मारून नेलेली आहे. तसेच त्यांचे दृष्टीदोषाचे प्रमाणपत्र सुद्धा बनावट असल्याचे आरोप करण्यात येत आहे. आता त्यांचा बनवाबनवीचा खेळ थांबणार असल्याचे बोलले जात आहे.