श्रीलंकेचा ५० धावांत खुर्दा, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजचा भेदक मारा
कोलंबो (Hotstar) दि-17 सप्टेंबर आज भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या भेदक मारा करून अक्षरशः चिंधड्या उडवल्या.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. पण हा सामना श्रीलंकेसाठी खूपच वाईट ठरला. कारण संघाचा ५० धावात खुर्दा पाडण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय श्रीलंकेसाठी अजिबातच चांगला राहिला नाही. पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेचा अर्धा अधिक संघ तंबूत होता. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तालावर अक्षरशः श्रीलंकेचा संघ नाचताना दिसला. फायनलसारख्या सामन्यात श्रीलंकेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ अवघ्या ५० धावा करून ऑल आऊट झाला. श्रीलंकेसाठी ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहून संपूर्ण जग थक्क झालं आहे. कोलंबोमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा डाव अवघ्या १५.२ षटकांत ५० धावांत गुंडाळला. अवघ्या २१ धावांत ६ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे पार कंबरडे मोडले. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्याने ३ आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी असा कहर केला की, श्रीलंकेचा निम्मा संघ खातेही उघडू शकला नाही. श्रीलंकेचे पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाला.
श्रीलंकेच्या केवळ २ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. दुशान हेमंताने १३ धावांचे योगदान दिले. एकंदरीत श्रीलंकेचा संघ मोहम्मद सिराजसमोर गुडघे टेकतांना दिसला. सिराजच्या गोलंदाजीला त्यांच्याकडे उत्तर नव्हते आणि ते मैदानात येऊन थेट पॅव्हेलियनमध्ये जात होते. मोठी गोष्ट म्हणजे श्रीलंकेच्या सर्व १० विकेट भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. यासह भारतीय संघाला आशिया चषक २०२३ चे जेतेपद पटकावण्यासाठी अवघ्या ५१ धावांचे आव्हान आहे. यामुळे भारताचे या सामन्यात विजयासह सर्वाधिक आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न साकार होणार आहे.