‘सबका साथ सबका विकास’ यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची गोची,उद्या मंत्र्यांना खातेवाटप होणार
मुंबई दि-12 गेल्या दहा दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप काँग्रेसच्या एका गटामुळे अडकून पडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. हा गट आधी भाजप आणि आता राष्ट्रवादी सोबत येण्याच्या तयारीत असून तो आल्यानंतरच विस्तार आणि खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप बरोबर सहभागी झाला. त्यातील नऊ नेत्यांना मंत्रिपद मिळाले, पण अजूनही त्यांना खातेवाटप झालेले नाहीये.
काँग्रेस फुटण्याच्या चर्चांना उधाण ?
महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याचे वृत्त दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांनी यातील अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून बैठक घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेकांना पक्ष न सोडण्याबाबत स्पष्ट शब्दात समजावलंय. दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर काही ‘इच्छुक’ आमदारांची मानसिकता बदलल्याची चर्चा आहे. पण काही जण भाजप तर काही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने आता पुढे नक्की काय होणार ? याची उत्सुकता देशाला लागली आहे.
मात्र असे असले तरी आता उद्यापर्यंत मंत्रीमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे मंत्रीपदांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांची मंत्री होण्याची इच्छा शिगेला पोहोचली असून ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनची आतुरतेने वाट बघत आहे.आधीच राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या सत्तेतील सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अनेक इच्छुकांना मंत्रिपद मिळणे कठीण झाले आहे. शिंदेगटाचे हे 3-4 नेते सध्या मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत. पण ‘मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त’ या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे. त्यातही अर्थ, जलसंपदा आणि ग्रामविकास खात्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.