Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा AI च्या मदतीने शोध; जळगाव AHTU पथकाने केली उल्लेखनीय कामगिरी

AI तंत्रज्ञानामुळे पहिल्यांदाच पोलीस यंत्रणेला मोठे यश

जळगाव,दि-25/02/2026 – जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) ने सुमारे ८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या एका ९ वर्षीय मुलीचा शोध लावला आहे. ही मुलगी २०१८ मध्ये एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा क्रमांक ३५९/२०१८ अंतर्गत भादंवि कलम ३६३ व ३७० नुसार अपहृत झाली होती. आज तिचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शोध लागल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा दिसून आली आहे.
जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शोध न लागलेल्या अपहृत मुला-मुलींच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, अनेक प्रकरणे आदिवासी समाजातील मुला-मुलींशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले होते. या मुला-मुलींची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने शोधकार्य कठीण झाले होते. यासाठी मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते, पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU कक्षाचे प्रभारी सर्पोनि/हरीदास बोचरे, पोउपनिरी/दिनेश बडगुजर, श्रेपोउपनिरी/रवि पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली.
पथकाने आदिवासी समाजाच्या मेळावे, यात्रा, उत्सव आणि आठवडे बाजार येथे विशेष लक्ष ठेवले. होळी निमित्ताने कर्जाणे (ता. चोपडा) येथे भरलेल्या भोंगऱ्या बाजारात एक १५-१६ वर्ष वयाची मुलगी एकटी दिसली. तिचे पालक सोबत नव्हते आणि तिला स्वतःचे नाव व पत्ता सांगता येत नव्हता. गोपनीय बातमीदाराने ही माहिती पोहेकॉ/दिपक पाटील यांना दिली. सर्पोनि/हरीदास बोचरे व पोउपनिरी/दिनेश बडगुजर यांनी तिचा फोटो मागविला असता, तो प्रलंबित गुन्ह्यातील मुलीशी जुळत नव्हता.
त्यानंतर AHTU शाखेतील प्रलंबित केसेसमधील अपहृत मुलींचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वयानुसार अपडेटेड (एज प्रोग्रेस्ड) फोटो तयार करण्यात आले. या फोटोंचे अवलोकन केल्यावर एका मुलीची चेहरेखुडी २०१८ च्या अपहृत ९ वर्षीय मुलीशी जुळत असल्याचे आढळले. यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ तपास पथक रवाना करण्यात आले.
पथकात पोउपनिरी/दिनेश बडगुजर, सर्फी/विठ्ठल फुसे, पोहेकॉ/दिपक पाटील, मपोहेकॉ/मनिषा पाटील, पोहेकॉ/किरण धनगर, सर्फी/सलीम शेख यांचा समावेश होता. गोपनीय पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या शोधकार्यात ही मुलगी सापडली. तिची ओळख निश्चित झाल्यानंतर तिला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते, पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने साध्य केली आहे. ८ वर्षांनंतर मुलीचा शोध लागल्याने पोलिसांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button