आधी एका मताने विजय, पुर्नंमोजणीनंतर 48 मतांनी पराभव ! मुंबईतील नाट्यमय घडामोडीची देशभर चर्चा
मुंबई ,दिनांक:५ जून, काल देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले असून यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आलेले आहेत. भाजपचे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालेले असून अनेक ठिकाणी स्टार प्रचारक आणि राज्यमंत्री असलेले उमेदवार पराभूत झालेले आहेत. असाच एक धक्कादायक निकाल मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात लागलेला आहे. या ठिकाणी आयत्या वेळी शिवसेना शिंदे गटात सामील झालेले रवींद्र वायकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्याशी सर्वात अटीतटीची लढत झालेली आहे. यात रवींद्र वायकर यांना ४५२६४४ तर अमोल कीर्तिकर यांना ४५२५९६ इतकी मते पडलेली असून या रवींद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झालेला आहे.
या ठिकाणी याआधी अमोल कीर्तिकर यांचा फक्त एका मताने विजय झाल्याची प्रशासनाकडून आधी घोषणा करण्यात आलेली होती. मात्र रवींद्र वायकर यांनी मतमोजणीवर हरकत घेतल्याने पुन्हा मतमोजणी करण्यात आली.आणी त्यात रवींद्र वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाल्याने याठिकाणी मोठी खळबळ उडाली. या ठिकाणी मतमोजणीमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा शिवसेना शिंदे गटात असलेले त्यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी छुपा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पक्षाविरोधी कारवाई केल्याचे आरोप झाल्यामुळे आता माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची एकनाथ शिंदे शिवसेना गटातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीत १५ जागा लढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जनतेच्या कोर्टात मोठा झटका बसलेला आहे. कारण सुपुत्र श्रीकांत शिंदेंसह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश आलं आहे. त्यात बुलढाणा, मावळ आणि हातकणंगलेचा समावेश आहे. तर ठाकरेंकडे असलेली ठाण्याची जागा खेचून आणत शिंदेंनी होमग्राऊण्डवर विजय मिळवला. याशिवाय औरंगाबादमधून संदीपान भुमरेंनी विद्यमान खासदार जलील यांच्यासह उद्धव ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे.