
भुसावळ, दि. १७ जानेवारी २०२५ : भुसावळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सत्ताधारी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या विद्यमान दप्तर आणि कारभाराला संत गाडगेबाबा रूग्णालयात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, या निर्णयाला आवश्यक ठराव, निविदा प्रक्रिया आणि परवानग्या घेण्यात आलेल्या नसल्याने या कृतीला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गटनेते युवराज लोणारी यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या स्थलांतर प्रक्रियेमुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित करत लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चौधरी यांनी विद्यमान नगरपरिषद इमारतीला “कोंडवाडा” असे संबोधून त्याची जर्जर अवस्था अधोरेखित केली होती. हाच धागा पकडून युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “जर ही इमारत कोंडवाडा असेल, तर सत्ताधारी त्याच कोंडवाड्यात गोरगरीब रूग्णांना उपचारासाठी दाखल करणार आहात का? नगरपरिषदेच्या दप्तर आणि कारभाराला रूग्णालयात हलवण्याच्या नावाखाली जनतेच्या आरोग्य सेवेशी खेळ होत आहे.” लोणारी यांनी या प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हे स्थलांतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने थेट उचलून करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
सदर संत गाडगेबाबा रूग्णालयात सध्या भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलांची प्रसूतीसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा पुरवता येत नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागात गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी काही वर्षांपूर्वी गरूड परिवाराने नगरपालिका दवाखान्यासाठी जागा दान केली होती. या पार्श्वभूमीवर लोणारी यांनी सत्ताधारी आणि नगराध्यक्षांची जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, “भूलतज्ज्ञ व इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही नगराध्यक्ष आणि सत्ताधारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याऐवजी दप्तर स्थलांतरित करण्याच्या नाटकातून जनतेच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही.”
पुढे बोलताना लोणारी यांनी सकारात्मक सूचना केली. ते म्हणाले, “नगरपरिषदेच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून नवीन नगरपरिषद बांधण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून आमचा कायम पाठिंबा राहील.” मात्र, सध्याच्या स्थलांतर प्रक्रियेवरून त्यांनी कडक इशारा दिला. “जिल्हाधिकारी जळगाव यांची पूर्व परवानगी घेऊनच सदरील स्थलांतराची प्रक्रिया राबविण्यात यावी. तसे न करता नगरपरिषदेचे दप्तर उचलल्यास दप्तर गहाळ होण्याचा धोकाही आहे. अशी अनधिकृत कृती कायद्याच्या कक्षेत येऊ शकते,” असे ते म्हणाले.
या घटनेवरून भुसावळ नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. शहरातील नागरिकांनी या प्रकरणात पारदर्शकता आणि जनतेच्या हिताचा विचार करण्याची मागणी केली आहे. पुढील काही दिवसांत या स्थलांतर प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्षा शैलैजा पुरूषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षीत बकुळ ,नगरसेवक पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे,प्रकाश बत्रा , विशाल नाटकर,गिरीश महाजन, सुजित भोळे, किरण कोलते उपस्थित होते.













