खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
मुंबई दि-०७/०१/२०२५, खनिकर्म विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून सर्व कामकाजामध्ये सुसूत्रता आणणार असल्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले तसेच खनिकर्म विभागातील सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला आहे. खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. राव, सह व्यवस्थापकीय संचालक अंजली नगरकर, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके तसेच विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई यांनी राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभाग, खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय, खनिज क्षेत्राची इ लिलाव प्रक्रिया जिल्हा खनिज प्रतिष्ठान, निधीचा विनियोग यासंबंधी कामकाजांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेतला. राज्य खानिकर्म महामंडळ संदर्भात संचालनालयाबाबत सामान्य माहिती, राज्यातील खनिज निहाय खाणपट्टी, महसूल यशस्वीरीत्या लिलाव झालेली खनिज क्षेत्रे,एकात्मिक लीज व्यवस्थापन प्रणाली,तंत्रज्ञान अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे संचालनालय मार्फत चालू असलेल्या अन्वेषण प्रकल्पांचा तपशील, लिलाव झालेल्या खनिज क्षेत्राची स्थिती, खनिज उत्पादन इत्यादींचा सविस्तर आढावा मा. मंत्री यांनी घेतला.
तसेच विभागामार्फत मसुदा तयार करून सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या
पुढील १०० दिवसांत खनिकर्म विभागांतर्गत घ्यावयाच्या कामांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. निष्पादन झालेल्या आठ खाणक्षेत्रांपैकी चुनखडक या खनिजाच्या एक खाणपट्ट्याचे कार्यान्वयन करणे, जास्तीत जास्त खाणपट्टी लिलावास काढण्यासाठी राज्यांमध्ये अन्वेषण वाढविणे, एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन, संगणकीय प्रणाली २.० लागू करणे, महाजेनको- एमएसएमसी- कोल वॉशरी यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणे, महसूल वाढीच्या दृष्टीने २०१५ च्या अधिसूचनेनुसार घोषित गौण खनिजांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांचे संनियंत्रण खनिकर्म विभागाकडे घेणे याबाबत चर्चा करण्यात आली.