जळगावात महायुतीच्या मेळाव्यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील अनुपस्थित,चर्चांना उधाण
रक्षा खडसेंचा प्रचार करण्यासंदर्भात सस्पेन्स कायम
जळगाव -दि:२५ एप्रिल ,आज जळगाव गावात महायुतीच्या रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्मिता यांनी भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. या मेळाव्यात महायुतीतील भाजप ,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि इतर घटक पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील भुसावळचे आमदार संजय सावकारे, जळगावचे आमदार सुरेश भोळे ,पाचोर्याचे आमदार किशोर पाटील, एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील , चोपडाच्या आमदार लता सोनवणे यांच्यासह सर्वच घटक पक्ष्यांचे जिल्हाध्यक्ष व जिल्हाप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात असलेले चंद्रकांत पाटील हे आज झालेल्या महारॅलीमध्ये किंवा सभेमध्ये कुठेही नजरेस पडले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील विड्या भोपळ्याचे नाते जिल्हासह राज्याला चांगलेच परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये घरोघरी चलो अभियानांतर्गत मतदारांच्या भेटीगाठी घेतलेल्या असून यावेळी महायुतीतील अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित असलेले दिसून आलेले आहे. मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रक्षा खडसेंनी सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानात चंद्रकांत पाटील हे आतापर्यंत कुठेही दिसून आलेले नाही. गौण खनिज उत्खनन प्रकरण चर्चेत
काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबीयांविरोधात मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील अवैध गौण खनिज उत्खनन कथीत घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे.
या याचिकेवर 30 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. खडसे कुटुंबीयांना दंड होण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे गेल्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले होते.
मात्र आज झालेल्या सभेत किंवा रॅलीत चंद्रकांत पाटील दिसून आल्याने त्यांची अनुपस्थिती आता जिल्ह्यासह रावेर लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनलेली आहे. येणाऱ्या काळात आता काय घडामोडी घडतात याकडे लोकांच्या नजरा लागून आहे.
एकनाथ खडसेंनी दिला राजीनामा
एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ते आता भाजपात घरवासी करणार असल्याचे सांगितलेले होते. आज त्यांनी राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असल्याची माहिती माध्यमांना दिलेली आहे. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला की नाही याबद्दल मौन बाळगलेले आहे. तसेच खडसे आता रक्षा खडसेंचा प्रचार करण्यास कधी सुरवात करतात याकडे जनतेच्या नजरा लागून आहेत.