जळगावात शिक्षक मतदारांना पैसे वाटले ? सुषमा अंधारेंच्या कथित व्हिडिओने खळबळ
जळगाव,दि-२३ जून, काल जळगाव येथे महायुतीचे नाशिक विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली होती.त्या सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला असून त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर एक कथित व्हिडिओ क्लिप शेअर केलेली आहे.यात एक व्यक्ती काही लोकांना यादीतील नावावर खूण करून पैसे वाटप करत असताना दिसत आहे.यावर सुषमा अंधारे यांनी कुठाय निवडणूक आयोग ? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.
त्यामुळे या कथित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबाबत आणि होणाऱ्या पैशांच्या वाटपाबाबत आता निवडणूक आयोगाची काय कारवाई होते, याकडे जिल्ह्यातील राजकारण्यांच्या ,शिक्षकांच्या आणि पैसे स्वीकार करणाऱ्या कथित मतदारांच्या नजरा लागून आहेत. या व्हिडिओमुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता असून नाशिक विधान परिषद शिक्षक मतदार संघात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.