Advertisement
अर्थकारणआंतरराष्ट्रीयक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगाव बोगस कॉल सेंटर प्रकरण : सीबीआय धाड टळली होती ? आता मात्र ‘अविनाश’चा धागा पकडून सीबीआय पुन्हा सक्रिय ?

जळगाव दि. १० ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील सायबर फसवणुकीचे जाळे उघडकीस येत असताना, जळगावच्या ममुराबाद येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणात सीबीआयची नियोजित धाड ‘लिक’ झाल्याने थोडक्यात टळल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांच्या कारवाईमुळे काही बडे राजकीय नेते आणि अधिकारी थोडक्यात बचावले, असा दावा करण्यात येत असला, तरी मात्र येत्या आठवड्यात ‘अविनाश’ नामक बड्या पोलिस अधिकाऱ्याची कनेक्टिव्हिटी तपासून जळगाव शहरातील काही बड्या राजकीय व्यक्तींची चौकशी होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. सीबीआयने यापूर्वी केलेल्या विविध प्रकरणांतील आरोपींच्या चौकशीमध्ये ठाणे क्राइम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा आणि ‘अविनाश’ या नावाचा धागा तपासात समोर येत असून, या प्रकरणाने राजकीय वादाला तोंड फोडले आहे. सीबीआय गेल्या काही दिवसांपासून मुंबई प्रदेशातील या प्रकरणांची सखोल चौकशी करत आहे. यातून आंतरराष्ट्रीय रॅकेट समोर आलेलं असून, यामाध्यमातून अमेरिका आणि ब्रिटनच्या अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
जळगावमधील धक्कादायक खुलासा
२८ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हा पोलिसांनी ममुराबाद शिवारातील एल के फार्म हाऊसवर धाड टाकली, जिथे माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) नेते ललित कोल्हे यांच्याशी संबंधित बोगस कॉल सेंटर उघडकीस आले. या सेंटरमधून परदेशी नागरिकांना फसवले जात होते. पोलिसांनी ४ ते ८ आरोपींना अटक केली, ज्यात कोल्हे यांचा समावेश आहे. कोल्हे यांच्या पत्नी सरिता माळी यांनी सांगितले, “फार्म हाऊस भाड्याने दिले होते, पण भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासली नाही.” न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अविनाश’चा संशयास्पद धागा
सीबीआयच्या तपासात ठाणे येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी ‘अविनाश’च्या नावाचा उल्लेख समोर आला आहे. २०१६ मध्ये ठाणे कॉल सेंटर स्कॅममध्ये अविनाश मास्टर नावाचा २५ वर्षीय आरोपी पकडला गेला होता. तसेच, २०१८ मध्ये ठाणे एसीपी अविनाश पलाडे यांच्यावर असा गुन्हा दाबल्याचा आरोप झाला होता. २०२२ मध्ये अविनाश अंबुरे नावाच्या अधिकाऱ्यावर ६ कोटींच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. सीबीआय आता या धाग्यांचा जळगाव प्रकरणाशी संबंध तपासत आहे. सूत्रांनुसार, ही रॅकेट्स राजकीय संरक्षणाखाली आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालत असल्याचे काही पुरावे सीबीआयला मिळत आहेत.
सेटअप करणारे हेच,त्यामुळे मोठ्या रॅकेटचा संशय
दरम्यान, जळगाव शहराजवळ मुमराबाद येथील एलके फार्म हाऊसवर कॉल सेंटरचा सेटअप करणाऱ्या मुंबईतील आरोपींनी यापूर्वी नाशिक, इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील कॉल सेंटरचा सेटअप केल्याचे सीबीआयचे तपासात उघड झालेले आहे. सीबीआयने जळगावच्या प्रकरणाची लिंक ठाणे, इगतपुरी आणि  नाशिकशी जुळवून तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआयचे विशेष पथक अटक केलेल्या आरोपींची कॉल डिटेल्स हिस्ट्री चेक करत असून त्यांच्या संपर्कांचीही चौकशी करत आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणी जळगावातील काही बड्या राजकीय नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रातील सायबर फसवणुकीचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील आरोपी पकडण्याआधीच फरार
जळगाव प्रकरणातील प्रमुख संशयितांना मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पकडण्यासाठी गेलेल्या आरोपींना कारवाईची माहिती आधीच ‘लिक’ झाल्याचे बोलले जात असून, त्यामुळे ते फरार होण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. सदरील आरोपी समुद्रामार्गे दुबईत फरार झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.हे आरोपी पकडले गेल्यास अनेकांचे घोडे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button