जामनेर नगराध्यक्षपदी साधना गिरीश महाजन बिनविरोध ! मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम
नगराध्यक्षपदाची हॅट्रिक

जळगाव -दि-20/11/2025, जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निश्चीत झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे अशा तिन्ही उमेदवार बिनविरोध निश्चीत झाल्या आहेत. त्यानंतर आज जामनेर नगर परिषदेच्या काही उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहे.
नगराध्यक्षपदाची हॅट्रिक
जामनेर नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी आज अचानक अर्ज माघारी घेतल्याने साधना गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जामनेरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विशेषतः यामुळे साधना महाजन यांनी बिनविरोध हॅट्रिक साधली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात नवा अध्याय दिला गेला आहे.जामनेर नगरपरिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र विरोधकांसाठी ही खूप मोठी धक्कादायक घटना मानली जात आहे. यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांकडून तुफान जल्लोष करण्यात आला आहे.













