Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा अधिक्षक अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला, दिपनगरातील लाचखोरांमध्ये मोठी खळबळ

भुसावळ, दि. २० नोव्हेंबर २०२५ , प्रदूषण ,चोरीच्या घटना, राखेतील भ्रष्टाचार यामुळे कायम चर्चेत असलेल्या दिपनगर वीजनिर्मिती प्रकल्पात एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील (२१० मेगावॉट) अधिक्षक अभियंता भानुदास पुंडलीक लाडवंजारी (वय ५७, रा. प्लॉट नं. ३१, नेहरू नगर, जळगाव) यांनी खाजगी कंपनीच्या २ लाख २८ हजार ५४४ रुपयांच्या बिलाच्या मंजुरीसाठी ५ टक्के म्हणजे सुमारे ११,४२७ रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५,००० रुपयांवर ठरले; मात्र लाच देण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (अँटी करप्शन ब्युरो) तक्रार दाखल केली. त्यानुसार आज बुधवारी (दि. २० नोव्हेंबर २०२५) भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाची हकिकत अशी
तक्रारदार हे एका खाजगी कंपनीचे प्रतिनिधी असून, त्यांच्या कंपनीला दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पॉवर प्लांटच्या तळाशी जमा झालेली राख (ॲश) उचलणे, मोडतोड करणे, तेलाची बॅरल्स काढणे आणि वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कामाचे एकूण २,२८,५४४ रुपये किंमतीचे बिल मुख्य अभियंता (बी.टी.पी.एस. विभाग), दिपनगर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले होते.
सदर बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अधिक्षक अभियंता भानुदास लाडवंजारी यांनी तक्रारदाराकडे बिलाच्या ५ टक्के म्हणजे ११,४२७ रुपये लाच मागितली. बरेच बोलणे झाल्यानंतर तडजोडीअंती ५,००० रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आलोसे लाडवंजारी यांनी पुन्हा ५,००० रुपये लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील सापळा कारवाई सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे.
दरम्यान, या गुन्ह्याची नोंद भुसावळ तालुका पोलीस ठाणे  गु.र.नं. : २१६/२०२५  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७  नुसार दाखल करण्यात आले आहे. सापळा व पर्यवेक्षण अधिकारी हे योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक असून,यांचे तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक हे आहेत.
पंच म्हणून किशोर महाजन उपस्थित होते.
या पथकात पो.ना. बाळू मराठे, पो.शि. अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर, भूषण पाटील सर्व ला.प्र.वि. जळगाव हे सहभागी झाले होते.
सदरील कारवाई ही नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी व श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पा सारख्या महत्त्वाच्या सरकारी विभागात वरिष्ठ अधिकाऱ्याचेच असे भ्रष्टाचाराचे प्रकार समोर येत असल्याने खाजगी कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव करीत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button