दीपनगर विद्युत केंद्रात स्फोट, दोन कामगार गंभीर जखमी, कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर ? प्रशासनाचे कानावर हात
भुसावळ, दिनांक-06/10/2024 भुसावळ जवळील दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन 660 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामध्ये आज सकाळी 10 वाफेच्या सुमारास गॅस कटींगचे काम सुरू असतांना अचानक मोठा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत फुलगाव येथील कामगार दीपक बाविस्कर तसेच एक परप्रांतीय कामगार अमितकुमार हे दोन कंत्राटी कामगार जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील रिदम या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, जखमी झालेले दोन्ही कंत्राटी कामगार हे पावरमेक या खासगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकल्पात अनेकदा लहानमोठे अपघात घडत असतात. तथापि, स्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ प्राथमिक उपचार सुविधा देखील मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकल्पात दोन महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच
अपघात झाला होता, अशी माहिती स्थानिक कंत्राटी कामगार व कंत्राटदारांनी दिलेली आहे. तथापि, स्थानिक प्रशासन व संबंधीत कंपनीकडून सदरील प्रकरण दडपण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे.
आज झालेल्या या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन, जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा नियमानुसार विमा सुद्धा काढला जात नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिपनगरच्या या प्रकल्पात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढल्याच्या अनेक घटना समोर आलेले आहे.यात प्रामुख्याने स्टीलच्या प्लेट्स चोरी झालेल्या आहेत.त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. काही महिन्यांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात चक्क सुरक्षारक्षकच चोऱ्यांमध्ये चोरांना सहकार्य करत असल्याची बाब समोर आलेली होती.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी याच प्रकल्पातील अवैधरित्या तोडलेल्या शेकडो वृक्षतोडीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या संदर्भात महापारेषण कंपनीकडून अजून पर्यंत ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे.