पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्यांचे 'रहस्य' कायम
जळगाव,दिनांक-13/01/2024, राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अनेक तब्बल एक महिन्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात शपथविधी होऊन 39 जणांना मंत्रीपदे जाहीर करण्यात आलेली होती. त्यालाही बराच अवधी उलटून गेल्यानंतरही आज पावतो राज्यातील सर्वच जिल्ह्यांची पालकमंत्री पदे अजूनही रिक्त असून त्याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबितच आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असून बीड मधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ दोषींसह त्यांच्या ‘आकां’ना अटक होऊन कडक शिक्षा होण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत असून या प्रकरणामुळेच राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे.
दरम्यान मंत्रीपदाचा शपथविधी पार पडून आता आता वीस दिवस होऊन गेले असून अजूनही कोणत्याच मंत्र्यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पौष महिन्यातील पंचांगांवर विश्वास ठेवणारे बहुतेक मंत्री असल्याने कोणतेही विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करताना योग्य शुभमुहूर्ताची वाट पाहिली जात असून मंत्रालयातील बहुतांश महत्वपूर्ण कामकाजाला मंत्र्यांच्या शिफारशी अभावी ‘ब्रेक’ लागलेला आहे.
तसेच ग्रामीण भागातील विकास कामांच्या प्रस्तावांची मंजुरी ही जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्राच्या शिफारशीने राज्य शासनाकडे पाठवलेली असते. मात्र पालकमंत्री पदच रिक्त असल्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठका होताना दिसत नाहीये. त्यामुळे विकास कामांच्या अनेक फायली या पालकमंत्र्यांच्या शिफारशी अभावी प्रलंबित पडल्याचे राज्यभरातील चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची अजून काही दिवस फक्त चर्चाच सुरू राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांचे 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहणाचे कार्यक्रम हे तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्याच हस्ते पार पडणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. जर याआधी पालकमंत्री पदांची नियुक्ती झाली तरच, मात्र पालकमंत्र्यांच्यांच हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त जिल्हा निहाय ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पालक मंत्री पदाची नियुक्ती ही मराठी ‘माघ’ महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात 30 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.