पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ ने रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई: काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सेवा मोठ्याप्रमाणावर विस्कळीत झाली आहे.अतिवृष्टीमुळे उपनगरीय रेल्वे सेवेच्या तिन्ही मार्गांवरील वेळापत्रक कोलमडले असून यामुळे रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी सायंकाळच्या वेळेत कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल ट्रेन्स विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. मी काहीवेळापूर्वीच रायगड, ठाणे, पालघर, वसई-विरार या भागांमधील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. याठिकाणी काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतही महानगरपालिकेला अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सीएसएमटी,दादर, भायखळा, कुर्ला आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. रेल्वे सेवेचा खोळंबा झाल्याने या प्रवाशांना घरी जाण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे या प्रवाशांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर तशी घोषणा करण्याविषयी सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
याशिवाय, ट्रेन्स उशिराने धावत असल्याने स्थानकांवर झालेली गर्दी पाहता प्रवाशांसाठी एसटी आणि बसेस सोडणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानुसार रेल्वे स्थानकांच्या बाहेरून तातडीने बस आणि एसटी सोडण्यात येतील. सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर आणि ठाणे या रेल्वे स्थानकांबाहेरून या बसेस सुटणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि बोरिवली स्थानकांबाहेर मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.