भाजपकडून तिकीट ‘फिक्स ‘, सोमवारी भाजपची विधानसभा उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर
भाजपने विधानसभेचे रणशिंग फुंकले
जळगाव दि-20/09/2024, पुढील महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू असून काही ठिकाणी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी दावा ठोकण्यास सुरुवात करून खळबळ उडवून दिलेली आहे. त्यामुळे आता काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची संभाव्य यादी निश्चित केल्याची माहिती समोर आलेली आहे. यात भाजपने आघाडी घेतलेली असून येत्या सोमवारी 23 तारखेला या संदर्भात मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात मॅरेथॉन बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीत भाजपच्या सिटिंग आमदारांपैकी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात जनाधार दिसून आलेल्या पहिल्या 50 संभाव्य इच्छुक सिटिंग आमदारांची यादी निश्चित केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातून मंत्री गिरीश महाजन, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.तर रावेर लोकसभेसाठी ऐनवेळी नाव मागे पडलेल्या माजी खासदार कै.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळालेली आहे. ते हल्ली भाजपचे रावेर लोकसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.वरील चौघांना कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जळगावचे गेल्या दोन टर्म पासून मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांचे नाव या पहिल्या टॉप उमेदवारांच्या यादीत नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांचे नाव कदाचित दुसऱ्या यादीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या सोमवारी भाजपची विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असून याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.