Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळच्या तापी नदीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला; भावाचा मृत्यूवर संशय, सखोल चौकशीची मागणी

भुसावळ, दि. १७ डिसेंबर २०२५: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरा खुर्ड गावातील २० वर्षीय इंजिनीअरिंग डिप्लोमाचा विद्यार्थी असलेल्या हितेश सुनिल पाटील याचा मृतदेह आज भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आढळून आला. हितेश १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजता जळगाव येथील रामानंद नगरातील रूमवरून कोणास काही न सांगता बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याचा मोठा भाऊ रितेश सुनिल पाटील (वय २३, व्यवसाय शेती) याने १५ डिसेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दिली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, हितेशने बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या रूममेट्सना काही न सांगता मोटारसायकलने निघून जाण्यापूर्वी मित्र मोहित पाटील याला फोन करून सांगितले होते की, “मी ज्या मुलीशी प्रेम करतो, तिच्या वडिलांनी माझ्यावर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.” त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. शनिवारी रात्री २:३३ वाजेपर्यंत त्याचा फोन चालू होता, मात्र नंतर तो बंद झाला आणि मोबाईल गहाळ झाला.
दरम्यान, कुटुंबीयांनी जळगाव, तापी पूल भुसावळ आणि विवरा खुर्ड परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. १४ डिसेंबर रोजी हितेशची मोटारसायकल तापी पुलावर उभी अवस्थेत आढळली आणि भुसावळ शहर पोलीसांनी ती ताब्यात घेतली होती.
आज दुपारी भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात हितेशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल प्रलंबित आहे. मयत हितेश हा त्रिमूर्ती संस्थेत इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत होता आणि जळगावमध्ये रूम घेऊन राहत होता. कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करते.
मयताच्या मोठ्या भावाने रितेश पाटील यांनी भावाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत भुसावळ शहर पोलीसांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. प्रेमप्रकरणाशी संबंधित तक्रारीमुळे हितेशच्या मृत्यूचे प्रकरण आता पोलिसांसाठी अधिक गुंतागुंतीचे झालेले आहे.
मयत हितेशच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ रितेश आणि आजी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास सुरू आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button