
भुसावळ – भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडलेल्या असून, प्रभाग क्रमांक पाच ‘ब’ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परीक्षित पुंडलिक बऱ्हाटे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्याने आणि आता कोणीही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने परिक्षीत बऱ्हाटे यांचा विजय निश्चित झालेला आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रभाग क्रमांक 8 मधून मुकेश पाटील, प्रभाग क्रमांक 21 मधून निर्मल उर्फ पिंटू कोठारी तसेच प्रभाग क्रमांक 23 ‘अ’ मधून महिमा अजय नागराणी यांची त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार शिल्लक नसल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
अशोक चौधरी यांची दुसऱ्यांदा माघार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेले अशोक पितांबर चौधरी हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक 21 मधून वैयक्तिक कारणास्तव माजी आमदार संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांच्याशी चर्चा करून माघारी घेऊन धक्का दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 5 मधून माघारी घेऊन सलग दुसऱ्यांदा भाजपच्याच उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोकळा केल्याचे बोलले जात आहे. आता यासंदर्भात पुढे केवळ प्रभाग क्रमांक चार ‘ब’ आणि 11 ‘ब’ या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.













