
जळगाव दि-०५/०४/२०२५ , केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय तसेच सर्व वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली.या बैठकीदरम्यान डीआरएम श्रीमती इति पाण्डेय यांनी संपूर्ण मंडळात चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा विकासकामांची माहिती राज्यमंत्री यांना दिली. प्रवासी सुविधांचा विकास, अधोसंरचनेत सुधारणा व स्टेशन विकास यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले – गाडी क्र. 01211/01212 (बडनेरा – नाशिक मेमू) ला बोदवड व वरणगाव स्थानकांवर थांबा, तसेच गाडी क्र. 22221/22222 (मुंबई–निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस) ला भुसावळ स्थानकावर थांब्याची मंजुरी देण्यात आली आहे.
भुसावळहून मुंबईसाठी स्वतंत्र गाडी नाहीच
अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई गाडी क्र. 12112 (अमरावती एक्सप्रेस) मध्ये आरक्षणासाठी बर्थ वाढविण्यात आली आहे. अमरावती येथून सुटणाऱ्या या गाडीमध्ये 1AC साठी 2, 2AC साठी 12 आणि स्लीपरसाठी 30 अतिरिक्त बर्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. अमरावती एक्सप्रेसला भुसावळ येथून 4 स्लीपर बर्थ वाढविण्यात आले आहेत. मात्र भुसावळहून मुंबईसाठी स्वतंत्र गाडीची मागणी अजूनही पूर्ण होताना दिसून येत नाहीये. मात्र KAVACH, MTRC व इतर अपघात सुरक्षा संबंधित महत्वपूर्ण अशा एलटीई आधारित कम्युनिकेशनसाठी नवीन EPC (Evolved Packet Core) व कंट्रोल कमांड सेंटर भुसावळ येथे उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच पाचोरा–जामनेर–बोदवड रेल्वे मार्गावरील पहुर स्थानकावर मालधक्का उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जालना –जळगाव रेल्वेमार्ग हा पाचोरा–जामनेर मार्गाला 30.5 मीटर रेल ओव्हर रेल (ROR) च्या माध्यमातून ओलांडेल. हा ROR नवीन पहुर स्थानकापासून सुमारे 1.2 किमी अंतरावर असेल.
भुसावळ–जेएनपीटी दरम्यान कंटेनर रेल्वे वाहतुकीच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यात आली. भुसावळ CRT ला कंटेनर वाहतुकीसाठी अधिसूचित करण्यात आले असून इच्छुक व्यापाऱ्यांनी लोडिंगसाठी इंडेंट नोंदणी करू शकतात. सद्यस्थितीत अंदाजे १५०० केळी कंटेनर रस्तेमार्गे जात आहेत.
मेमू गाड्यांच्या देखभाल सुविधेसाठी 08/2021 मध्ये मंजुरी मिळालेली असून यामध्ये 450×15 मीटर निरीक्षण पीट, 110×15 मीटर हेवी रिपेअर शेड, कार्यालयीन इमारत, कर्मचाऱ्यांचे विश्रांतिकक्ष व व्हील लेथ यांचा समावेश आहे. सदर काम प्रगतीपथावर असून यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सर्व प्रगतीशील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्याचे आवाहन केले. या बैठकीस अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री. सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री. एम. के. मीणा आणि सर्व वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते.