भुसावळातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात, ‘कम्प्लिशन’ नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
भुसावळ दि-09/10/2024, भुसावळ शहरातील सर्वे नंबर 161 मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ई- लिलाव करणार असल्याची जाहिरात दि-01/10/ 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली होती. मात्र सदरील व्यापारी संकुलाचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ( complition certificate) नसून सदरील e-लिलाव प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याने या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतची चौकशी करून सदरील ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देणार असल्याचे तोंडी आश्वासन दिल्याचे केदारनाथ सानप यांनी सांगितलेले आहे.
दरम्यान, भुसावळ नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रिया संदर्भातील या कायदेशीर बाबींच्या गोंधळामुळे जिल्हाधिकारी ,जळगाव यांनी संबंधित व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश काढल्यास भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवर झालेला खर्च हा मुख्याधिकारी यांच्याकडून वसुल केला जाऊ शकतो ? अशी शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या आठवड्यात नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांना नगर परिषदेच्या नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याआधी कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती न दिल्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून येणाऱ्या स्थगिती आदेशाकडे भुसावळातील व्यापारी वर्गासह नागरिकांच्या नजरा लागून आहेत.
व्यापाऱ्यांनी दिली होती हित/अहित जाहिरात
भुसावळ शहरातील भुसावळ शहर मुनिसिपल शॉपकीपर्स असोसिएशनने दि-05/10/2024 दै. दिव्य मराठी मध्ये या ई-लिलाव प्रक्रियेसंदर्भात हित/अहित जाहिरात दिलेली होती. याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दिनांक-07/10/2024 रोजी या जाहिरातीला भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी जाहीर नोटीसद्वारे वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून संबंधित व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक-08/10/2024 रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात येऊन लेखी खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रियेदरम्यान झालेल्या भोंगळ कारभाराची भुसावळ शहरात एकच चर्चा सुरू झालेली आहे.