
भुसावळ,दि-03/02/2026, नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अनेक विषय मंजूर झाले, तर काही विषयांवर जोरदार चर्चा आणि विरोध झाला. सभेदरम्यान प्रभाग क्रमांक २ मधील पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाइन टाकण्याच्या विषयावरून विशेषतः वाद निर्माण झाला, ज्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जेष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सर्व प्रकरण शांत झाले. तसेच विषय क्रमांक एक मधील कब्रस्तानला लाकडे व गौऱ्या पुरवण्या संदर्भात मंजुरी देण्याच्या आधीच भाजपचे घटनेते युवराज लोणारी यांनी लक्षवेधी सूचना मांडत सांगितले की , या विषयावर यापूर्वी लेखापरीक्षक यांनी आक्षेप नोंदवलेले आहे. त्यामुळे हा विषय काळजीपूर्वक मंजूर करावा अशी सूचना केली.
विषय क्रमांक 22 नुसार उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रातून पाणबुडीद्वारे पाणी उचल करून जॅकवेलमध्ये घेणे करता मंजुरी प्रदान करण्याबाबतचा विषय पटलावर ठेवण्यात आल्यानंतर पाणबुडी या व्याख्येबाबत अधिकारी समाधानकारक माहिती देऊ शकले नसल्याने सर्वच नगरसेवकांनी एकमुखाने याबाबत नाराजी दर्शविली. पाणबुडी म्हणजे प्रशासकीय भाषेत नेमके काय ? याचे कोणते उत्तर देण्यास अधिकारी असमर्थ ठरले आहे.
आजच्या सभेत प्रभाग क्रमांक २ साठी तब्बल ४२ वेगवेगळे विषय मंजुरीसाठी ठेवल्यावरून भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी एकाच प्रभागासाठी इतके विषय मांडल्याने ‘लाडका नगरसेवक‘ योजना राबवली जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. याला नगरसेवक सचिन पाटील यांनी युवराज लोणारींवर आक्षेप घेत दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी इतर नगरसेवकांनीही या वादात उडी घेतल्याने सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ सभेचे कामकाज थांबले होते.
उर्वरित विषयांच्या मंजुरीबाबत भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना एक पत्र सादर केले होते. या पत्रात उर्वरित विषयांना मंजुरी देणे किंवा नामंजूर करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. सभेत काही विषयांना मंजुरी मिळाली असली तरी, प्रभाग क्रमांक २ च्या ४२ विषयांवरून उद्भवलेल्या वादामुळे सभेचे वातावरण तापले होते.
भुसावळ शहरातील सिटी सर्वे नंबर 161 मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर संकुलाची दुरुस्ती करणे तसेच मा न्यायालयाचे आदेशाने ६० गाळे आरक्षित ठेवून उर्वरित गळ्याची रक्षण प्रक्रिया राबवणे याला भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेऊन विरोध दर्शवला तसेच यापूर्वी जे 57 गाळेधारक होते त्यांना न्याय देण्याची मागणी नगरसेवक युवराज लोणारी यांनी केली.
तसेच आयत्या वेळेचा विषय म्हणून सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो लावण्यासंदर्भात सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.
नगरसेवक किरण कोलते यांनी जामनेर रोडवरील दिनदयाल नगर ते राजपूत चाट या अंतरावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्या संबंधित विभागाचे अधिकारी मनोज मोरे हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
आजच्या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, मुख्याधिकारी विवेक धांडे, राष्ट्रवादीचे गटनेचे सचिन चौधरी, जेष्ठ नगरसेवक संतोष चौधरी, विरोधी गटाकडून भाजपचे गटनेते युवराज लोणारी, आणि इतर बहुतांश नगरसेवक ,अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्त होता.













