
भुसावळ – दि-17/11/25, उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून आरक्षित जागा जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच सर्वात प्रबळ दावेदार म्हणून विद्यमान आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती असलेल्या आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून भुसावळ शहरासह तालुक्यात महिलांच्या हितासाठी विविध प्रकारचे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या सौ. रजनी संजय सावकारे यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा काँग्रेस) पक्षाने भुसावळ नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज सौ. सविता प्रवीण सुरवाडे (वय ३२, शिक्षण – बी.ए. पदवीधर, राहणार कला नगर, भुसावळ) यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या घोषणेमुळे भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे, ही उमेदवारी ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, परवा झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार एकनाथ खडसे यांनी गायत्री चेतन भंगाळे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली होती. आणि त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आज पडद्यामागे मोठ्या अनपेक्षित घडामोडी घडून उलथापालथ झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर करून आघाडीत बिघाडी केली आहे. कारण गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांना तब्बल 60000 मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सविता सुरवाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अजूनही काही अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करणार असून भुसावळात मोठी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी खूप मोठी गर्दी दिसून आली, उद्या पहाटेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले आहे.













