
भुसावळ – नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री शहरी आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या योजनेसाठी नियुक्ती केलेल्या सर्वेक्षण संस्थेच्या अध्यक्षा अंकिता लोखंडे यांनी या बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीत भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो किंवा प्रतिमा लावण्यात आल्या नव्हत्या. असा आरोप भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी केला आहे.

भुसावळ शहरातील 7/12 सिटी सर्व्हे तसेच झोपडपट्टीधारक असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घरबांधणीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ही योजना गरजू कुटुंबांना पक्के घर मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवली जात आहे.
यापुढे घरकुल योजना राबविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक बैठकीत किंवा शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा अनिवार्यपणे लावण्यात याव्यात, अशी मागणी भुसावळ नगरपरिषदेतील भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जोरदार आग्रह धरला असून, योजनेच्या प्रचारात आणि बैठकीत नेतृत्वाच्या प्रतिमा लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक युवराज लोणारी यांनी केली आहे
या मागणीचा उल्लेख आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षित बर्हाटे, सभापती अनिता सतीश सपकाळे, नगरसेवक राजेंद्र आवटे, शोभा रणधीर इंगळे, सीमा नरवाडे यांच्यासह माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे, सतिश सपकाळे आणि भाजपचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे उपस्थित होते.
भाजप नेत्यांनी योजनेतील लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत मिळावी आणि योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सूचना आणि मागण्या मांडल्या. ही योजना भुसावळ शहरातील अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असून, पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी नगरपरिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













