मंत्री ना.संजय सावकारेंच्या हस्ते सफाई कामगारांच्या सहा वारसांना भुसावळ नगरपालिकेत सेवा नियुक्तीपत्रे प्रदान
लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीपत्रे प्रदान

भुसावळ , दि-09/05/2025, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेतील मयत सफाई कामगारांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून शासन निर्णयानुसार निवड प्रकिया राबविण्यात आलेली होती.त्या अनुषंगाने सहा मयत सफाई कामगारांच्या वारसांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज प्रकरणे सादर करण्यात आली होती. सदरील अर्जांच्या मंजुरीसाठी नगर परिषदेच्या आस्थापना विभागातील अधिक्षक वैभव पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले परिपूर्ण प्रस्ताव मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेंद्र फातले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आलेला होता. त्यानंतर संबंधित सर्व पात्र सहा कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार भुसावळ नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरीचे आदेश दिले आहेत.


त्या अनुषंगाने आज भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सर्व पात्र सहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना भुसावळचे आमदार आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारेंच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलेली आहे.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नगरपालिका संगणक अभियंता अनिल गवारे,आरेखक महेश चौधरी आणि भुसावळ तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.













