मुक्ताईनगर दि-३०/१०/२०२४, मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड रंगत आलेले असून एखाद्या उमेदवाराच्या विरूध्द त्याच नावाचा डमी उमेदवार उभा करण्याची खेळी लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये झालेली आहे. तोच कित्ता आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत राबविला जात असून यात नामसाधर्म्य असल्याने मतदार संभ्रमात पडून बऱ्याचदा मोठे उलटफेर होऊन निवडणुकीत निकाल लागलेले आहेत. याचाच प्रत्यय मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत आज उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीअंती एक अकल्पनीय भन्नाट असा योगायोग जुळून आला असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही पहिलीच अद्वितीय घटना मानली जात आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे विद्यमान आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील हे तर महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे-खेवलकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, यांच्या जोडीला चंद्रकांत चुडामण पाटील (रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर) आणि चंद्रकांत शिवाजी पाटील (रा. चिंचखेडा, ता. मुक्ताईनगर) या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जोडीला वरील दोन चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत. दरम्यान, रोहिणी एकनाथ खडसे यांच्या सोबतीलाच रोहिणी गोकुळ खडसे (रा. बाभुळगाव, जिल्हा अकोला) व रोहिणी पंडित खडसे (रा. नागरतास, ता.
मालेगाव, जिल्हा नाशिक ) आणि रोहिणी संतोष कवळे (रा. इंदापूर, जिल्हा पुणे) या तिघींनी देखील अर्ज दाखल केला आहे. म्हणजेच मुक्ताईनगर मतदारसंघातून तीन चंद्रकांत पाटील विरुद्ध तीन रोहिणी खडसे अशी अफलातून गमतीदार लढती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. कारण सहसा डमी नाम साधर्म्य असलेले उमेदवार कधीही माघार घेत नाही. हा आजवरचा निवडणुकांचा अनुभव आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.