शिक्षिकेने तिच्याच 4 विद्यार्थ्यांना 2 लाखांची सुपारी देऊन घडवली प्रियकराची हत्या
नाशिक दि-20/08/2024, नाशिक शहरातील पंचवटी भागातून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी मोठी घटना समोर आलेली असून दोन मुलांची आई असलेल्या एका चाळीस वर्षीय शिक्षिकेने तिचा पती जिवंत असताना त्याच्या नकळत तिच्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी काही वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र त्याचा तिला त्रास होऊ लागल्याने तिने तिच्याच शाळेतील 4 तरूण विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्या विद्यार्थ्यांना तिच्या प्रियकराच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिली, आणि विशेष म्हणजे त्या चार आज्ञाधारक विद्यार्थ्यांनी देखील शिक्षिकेचा आदेश मानत पंचवटी भागात शिक्षिकेच्या प्रियकराच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचा खून केलेला आहे. या घटनेनं नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.
याबाबत आज नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार या शिक्षिकेसह चार तरूण विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, गगन कोकाटे (वय 25) रा.म्हसरूळ ,नाशिक असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर यातील मुख्य आरोपी असलेल्या शिक्षिकेचे नाव भावना कदम (वय 40) आहे. तसेच खून करणाऱ्या आरोपींची नावे अनुक्रमे, संकेत दिवे ( वय 20) ,मेहफुज सय्यद (वय 18 ), गौतम दुसाने (वय 18), रितेश सपकाळे (वय 20) या चौघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. बाहेरगावाहून शिक्षणासाठी नाशिकमध्ये आलेल्या या चार विद्यार्थ्यांच आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.