यावल-भुसावळ रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे व भेगा; कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी
चार महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीसाठी मजूर मिळत नसल्याचा अभियंत्यांचा दावा

भुसावळ,दि-12/02/2026– यावल तालुक्यातील भुसावळ ते यावल या केवळ १७ किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गावर गेल्या वर्षभरातच मोठ्या प्रमाणात खड्डे आणि उभ्या लांबीच्या भेगा पडल्याने हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. एक वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या खर्चात सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करून बांधलेला हा रस्ता निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे आणि कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे एक ते दीड वर्षातच फुटला आहे. यामुळे हजारो प्रवाशांच्या जीविताशी खेळ होत असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून कंत्राटदार, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, निरीक्षण अधिकारी यांच्यावर कठोर फौजदारी व दिवाणी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकानुसार, डांबरी रस्त्याचे आयुर्मान १५ वर्षे आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे किमान ३० वर्षे गृहीत धरून बांधकाम केले जाते. या कालावधीत रस्त्यात खड्डे पडणे, काम निकृष्ट दर्जाचे असणे किंवा पूल कोसळणे याची सर्व जबाबदारी कंत्राटदार आणि संबंधित पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची राहते. अशा प्रकरणात ते फौजदारी व दिवाणी जबाबदारीला पात्र ठरतात. तरीही यावल-भुसावळ या रस्त्यावर निकृष्ट साहित्य वापरले गेले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईट पट्ट्याचे काम पूर्ण केले गेले नाही. परिणामी, रस्त्यावर तब्बल ४०० मीटरपर्यंत उभ्या लांबीच्या भेगा पडल्या आणि धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत.

दरम्यान , अंजाळे ते निमगाव या अंतरात प्रचंड धोकादायक खड्डे पडल्याने अपघाताची भीती वाढली आहे. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या रस्त्यावर दोन महिन्यांत अनेक दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे, ज्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना आहेत. तरीही संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले असले तरी त्याचा दर्जा अत्यंत सुमार आहे. गेल्या चार महिन्यांपासून याठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी त्याच्या कडेला साहित्य आणून टाकलेले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे न बुजवता, वरच्यावर बोगस थातुरमातुर पद्धतीने काम केले जात आहे. असे निकृष्ट काम केल्याने पुढील १० ते १५ दिवसांतच हे खड्डे पुन्हा उखडून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. खड्डे बुजविताना विभागाचा एकही जबाबदार अधिकारी किंवा अभियंता देखरेखीसाठी उपस्थित राहत नाही, अशी तक्रार आहे.
माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जीवनाचा आणि सुरक्षित प्रवासाचा अधिकार (अनुच्छेद २१ अंतर्गत) याबाबत दिलेल्या आदेशांचेही येथे उल्लंघन होत आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते.
या सर्व प्रकरणी स्थानिक नागरिक, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कंत्राटदार, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, पर्यवेक्षक अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्वरित रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, निकृष्ट कामाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.













