शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केलेल्या शाळांविरूद्ध कारवाई करा- शिक्षण उपसंचालक
विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास तात्काळ घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश

पुणे दि-२५/०६/२०२५, संपूर्ण राज्यातील विविध प्रकारच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना “शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबतच्या तक्रारी पुणे येथील शिक्षण संचालनालयास गेल्या काही दिवसांपासून तक्रारी प्राप्त होत आहेत.काही दिवसांपूर्वी इ. १० वी, ११ वी व १२ वी चे निकाल जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाकरीता संबंधित शाळा, महाविद्यालयाकडे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करत आहे.
दरम्यान , सुरवातीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील सर्वच शाळा, महाविद्यालये वरील कागदपत्रे विद्यार्थ्यास देताना प्रति विद्यार्थी २००/- बेकायदेशीरपणे गोळा करत असल्याची तक्रार शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आपले अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये यांना अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची पैशांची वसुली विद्यार्थ्यांकडून करण्यात येवू नये, याबाबत आपल्या स्तरावरून सक्त आदेश देण्यात यावेत. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील ज्या शाळांनी अशा पध्दतीने रक्कम घेतलेली आहे.अशा शाळांवर कार्यवाही करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे त्यांना परत करण्यात यावेत अशी मागणी तक्रारदाराने पुणे येथील शिक्षण संचालनालयाकडे केलेली आहे.
दरम्यान, दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केलेल्या शाळांविरूद्ध तात्काळ कारवाई करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास व अर्जदारास ई-मेल द्वारे सादर करण्यात यावा. असे आदेश डॉ वंदना वाहूळ शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक आणि सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना जारी करण्यात आलेले आहे.













