शेतकऱ्यांनी Farmer ID ओळखपत्राबाबत सावधान, फसवणूक रोखण्यासाठी कृषी आयुक्तालयाची स्पष्ट सूचना

पुणे, २४ सप्टेंबर २०२५: भारत सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी (Digital Farmer ID) तयार करण्यात येत आहे. मात्र, काही संस्था आणि सेवा केंद्रे (CSCs) भौतिक किंवा ऑफलाइन फार्मर आयडी कार्ड वितरित करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले असून, असे कोणतेही भौतिक कार्ड अधिकृत नसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र जारी करून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे कृषी आयुक्तालयाचे संचालक (ॲग्रीस्टॅक) अंकुश माने यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी (Farmer Registry) साठी फक्त डिजिटल ओळखपत्राची व्यवस्था आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने काही राज्यांमध्ये असे अनधिकृत कार्ड वितरित होत असल्याचे निदर्शनास आणले आहे. “कोणत्याही संस्थेला फार्मर आयडी कार्ड छापण्याची, वितरित करण्याची किंवा त्याच्या प्रती प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या अनधिकृत farmer id कार्डांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आयुक्तालयाने क्षेत्रीय पातळीवर व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात व्हॉट्सअॅप संदेश, वृत्तपत्रे, दवंडी आणि इतर माध्यमांचा वापर करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही भौतिक कार्डसाठी पैसे देऊ नयेत किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांनी या मुद्द्यावर बोलताना सांगितले की, डिजिटल फार्मर आयडी ही सरकारी योजनांच्या लाभासाठी आवश्यक आहे, पण ती फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. कोणतीही संस्था किंवा व्यक्ती अनधिकृत कार्ड विकत असल्यास त्वरित पोलिस किंवा कृषी विभागाकडे तक्रार करावी.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकारी किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा. अशा फसवणुकीपासून सावध राहून आपली आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षितता सुनिश्चित करा.













