16 वर्षांखालील मुलांना आता भारतात खाजगी क्लासेसमध्ये प्रवेशबंदी
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नवी नियमावली
मुंबई, ता. १८ : मेडिकल, जेईईसह विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नावांचा वापर करणाऱ्या खासगी क्लासेसना वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने आज नवीन नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मागील वर्षी कोचिंग हब कोटा येथे झालेल्या 24 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्याची देशात सर्वत्र अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्राच्या नव्या सूचनांनुसार क्लासचालकांना 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच ते विद्यार्थी आपले आहेत, असा दावा करता येणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या नावाने मोठ्या जाहिराती करून दिशाभूल करणाऱ्या क्लासेसना यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची हमी देणे बेकायदा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात पसरलेल्या खासगी क्लासेसना केंद्र सरकारचा हा मोठा धक्का असेल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते.
गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले आहे. चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. पालकांचा ओढा जास्त वाढल्याने खासगी कोचिंग क्लासेस चालकांनीही खोटी प्रलोभने आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक, संस्थाचालक येणार रडारवर
जेईई, नीट तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुणाच्या हमीचा दावा करत राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात क्लासेसचे जाळे निर्माण झाले आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये अनुदानित आणि सरकारी शाळांतील शिक्षक आपला वेळ खासगी शिकवणीसाठी देत त्यातून मोठी कमाई करतात; तर दुसरीकडे अनुदानित संस्थाचालक काही शिक्षकांना जबरदस्तीने आपल्याच शाळांमध्ये खासगी क्लासेसच्या शिकवण्या घ्यायला लावतात, यामुळे केंद्र सरकारच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे शाळा आणि खासगी क्लासेस चालवणारे शिक्षक, संस्थाचालक हे शिक्षण विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या आहेत नव्या मार्गदर्शक सूचना
1) कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही.
2) कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत.
3) पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
4) संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
5) विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच करण्यात येईल.
6) गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कोचिंग सेंटर कार्यरत ठेवू शकत नाही.
क्लासची स्वतंत्र वेबसाईट हवी
कोचिंग सेंटरने शिक्षकाची पात्रता, अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाईट तयार करावी. कठीण स्पर्धा आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावामुळे कोचिंग सेंटरने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अवाजवी दबाव न आणता वर्ग आयोजित केले पाहिजेत, अशीही अट यामध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करण्यात यावी.
अभ्यासक्रम किंवा क्लास मध्येच सोडला तरी उर्वरित परतावा मिळणार विद्यार्थ्याने क्लाससाठी पूर्ण पैसे भरले असतील आणि विहित कालावधीच्या मध्येच क्लास सोडला असेल, तर विद्यार्थ्याला उर्वरित कालावधीसाठीचे शुल्क १० दिवसांच्या आत परत केले जाईल. तसेच अभ्यासक्रमादरम्यान शुल्कवाढ केली जाणार नाही, असेही नियमावलीत म्हटले आहे. कोचिंग सेंटरना अवाजवी शुल्क आकारल्याबद्दल एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जावा किंवा त्यांची नोंदणी रद्द केली जावी, अशी तरतूदही करण्यात आली आहे.