संतोष चौधरींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर सिग्नल यंत्रणेत ‘बिघाड’ कसा झाला ?
रावेरच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम
मुंबई दि-३१, मार्च, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे काल काही म मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे. या मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी त्यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केलेला होता. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतर मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून ठराव करण्यात आला होता,आणि त्याबाबतं मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या नेत्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत रावेरच्या जागे संदर्भात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावावर तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी ह्यांचे होते. त्यानंतर रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव विचारात घेतले गेले असल्याची माहिती समोर आलेली आहे. या बैठकीत संतोष चौधरींचा गेल्या दहा वर्षातील पक्ष कार्यासाठी दिलेला वेळ,पक्षकर्तृत्व आणि पक्षवाढीसाठी केलेले पक्षकार्य याचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या गतकाळातील गुन्ह्यांचा विषय देखील या बैठकीतील चर्चेत निघाला होता. एक प्रकारे संतोष चौधरी यांची गेल्या दहा वर्षातील ‘हिस्ट्री’ काढण्यात येऊन चर्चेत घेण्यात आली होती.
‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर सिग्नलमध्ये ‘बिघाड’
काही दिवसांपूर्वी संतोष चौधरी यांनी आपल्याला शरद पवार साहेबांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत संतोष चौधरींचे नाव मागे पडल्याने आणि काल जाहीर झालेल्या यादीतही रावेरच्या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या बैठकीत संतोष चौधरी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे कां ? कारण संतोष चौधरींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर अजूनही उमेदवारी जाहीर का झाली नाही ? असा प्रश्न आता संतोष चौधरी यांच्या समर्थकांना पडलेला आहे. संतोष चौधरींच्या उमेदवारीला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर सिग्नल यंत्रणेत ‘बिघाड’ नेमका कसा झाला ? की कोण्या ‘सीनियर सेक्टर इंजिनियरने’ सिग्नल यंत्रणेत ‘बिघाड’ केला ? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.असो; तो विषय भविष्यात बाहेर येईलच , मात्र गेल्या काही दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची नाव निश्चिती होत नसल्याने एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व त्यांचे समर्थक संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.येत्या ५ एप्रिल रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार ऐनवेळी बदलला जाणार असल्याच्या चर्चा रोज सोशल मीडियावर सुरूच आहे.