Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
राजकीय
Trending

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन

गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण

नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी 4 जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.

            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी  स्वागत केले.   

            4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.    

            6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.

राष्ट्रपतींचे राजभवनात स्वागत

             आज आगमनानंतर येथील राजभवनातही त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, आशिष जायस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button