अतिवृष्टीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजलासह मूलभूत सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 19 : भारतीय हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. पावसामुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजल मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईसह राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज सायंकाळी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत विविध सूचना दिल्या. यावेळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव मनोज सौनिक, आपत्ती निवारण विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अप्पासाहेब धुळाज आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. यापासून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. या नागरिकांची भोजन, शुद्ध पेयजलासह, निवाऱ्याची व्यवस्था करावी. शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावा. स्थानिक प्रशासनाने सतर्क आणि दक्ष राहावे. पुराचा धोका असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. पशुधनाचीही काळजी घेण्यास सांगावे.
कोकणातील रस्त्यांवर दरड कोसळण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर दळण- वळणाच्या सुविधा पूर्ववत करण्यासाठी पथके गठित करावीत. आवश्यक तेथे वायरलेस आणि सॅटेलाइट टेलिफोनचा वापर करून नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. तसेच कोकण विभागातील शाळांना गुरुवार २० जुलै २०२३ रोजी सुटी घोषित करावी. आवश्यक तेथे पाऊस आणि पूरस्थितीचा आढावा घेवून स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात होणाऱ्या पावसामुळे तापी नदीला पूर येतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत तेथील पूर परिस्थितीची माहिती घेतली.
नागरिकांनी पर्यटनस्थळी जावू नये
राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे टाळावे. समुद्र किनाऱ्यांवर जावू नये. पोलीस यंत्रणेने पर्यटनस्थळांवर गस्त घालावी, असेही निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे, पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी दिले. प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी राज्यातील पाऊस, पूरस्थिती आणि केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.