Corona Return: राष्ट्रवादीच्या मंत्र्याला कोरोनाची लागण, कोरोनाची धडक थेट मंत्रालयात पोहोचली
संपर्कात असलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई दि:24 – corona Return JN.1 देशभरात पुन्हा एकदा कोरोना च्या नव्या अवतारानं डोकं वर काढलेलं आहे. जेएन.1 (JN.1)या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय.अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी विलगीकरण कक्षात आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.
कोरोना विषाणू अद्याप संपलेला नाही. जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वर काढलंय. मागील महिनाभरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाचे आठ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या काळात तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात आढळलेली रुग्ण मागील महिन्याच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 40 देशांतील कोविड डेटाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे.
WHO च्या रिपोर्टनुसार, या डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या जेएन.1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. पण ज्याप्रकारे रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता WHO ने सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतातही कोराना रुग्णांच्या संख्येत वाढ –
सर्वात आधी केरळमध्ये या नव्या व्हेरीयंटचे रूग्ण आढळून आल्यानंतर मागील 15 दिवसांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या नव्या विषाणूचा एक रूग्ण आढळून आलेला आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना देखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आज रोजी भारतामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3742 इतकी झाली आहे. जेएन.1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सक्रीय रुग्णांच संख्या दुपट्ट झाली आहे.