गाथा ‘ईडीग्रस्तांना’ अच्छे दिन येण्याची,भाकीत महाजनांची,गॅरंटी मोदींची ! आमदारांची राजकीय आत्महत्या ते पुनर्जन्म
काँग्रेस नेत्यांच्या भाजप नेत्यांशी गुप्त गाठीभेटींची चर्चा
मुंबई दि-१५, मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते मिलिंद मुरली देवरा यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी या भागात दहा वर्षे सेवा बजावलेले डॅशिंग निवृत्त पोलिस (आयपीएस) अधिकारी हेमंत बावधनकर हे सुद्धा सामिल झाले. काही दिवसांपूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन यांनी येत्या दहा ते पंधरा दिवसात राज्यात मोठे राजकीय भूकंप होणार असल्याची गॅरंटी दिली होती. त्या भूकंपाचा पहिला हादरा हा काँग्रेसला बसलेला आहे. पहिला पार्ट हा मुरली देवरा यांच्या रूपाने समोर आलेला आहे. मुरली देवरा यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र काँग्रेस साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.परंतु दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मिलिंद देवरांसाठी राजकीय पुनर्जन्मासाठीचा हा राजमार्ग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
काँग्रेस पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर हा पत्नीसह पक्षप्रवेश पार पडला. मिलिंद देवरा यांच्या जाण्याने दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडल आहे. गेली साडे पाच दशके म्हणजे जवळपास 56 वर्षांचा देवरा यांच्या घराण्याचा काँग्रेससोबतचा प्रवास त्यांनी थांबवला आहे. देवरा यांच्या प्रवेशावेळी, हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याचं आता स्पष्ट झालंय.
मागील वर्षी अनेक राजकीय तज्ञ व घटना तज्ञ हे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी वेगळा गट निर्माण करून स्थापन केलेल सरकार घटनबाह्य असून तो सर्व शिंदे गट अपात्र होणार असल्याचे माध्यमांमध्ये छातीठोकपणे सांगत होते. तसेच त्यांचे हे कृत्य म्हणजे ‘राजकीय आत्महत्या’ केल्याचे म्हटले होते. तेव्हापासून राजकीय आत्महत्या ही ‘संज्ञा’ नावारूपाला येऊन अनेकदा शिंदे गटाच्या आमदारांनी या शब्दाचा प्रयोग केलेला दिसून येतो. परंतु आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे वाचलेले एकनाथ शिंदे सरकार यामुळे आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर, राष्ट्रीय युवा महोत्सवात केलेला भव्य रोडशो केला आहे.त्याच दिवशी मुंबईतील अटल सेतूसह विविध विकासकामांची व प्रकल्पांची केलेली प्रचारयुक्त उद्घाटने प्रसारमाध्यमांनी लाईव्ह दाखविलेली आहे.एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे रणशिंग फुंकल्याची ही नांदी होती. मोदींनी लोकसभेच्या प्रचारात अप्रत्यक्ष आघाडीच घेतल्याची जाणीव आता शेंबळ्या लेकरापासून शेंबळ्या आमदारापर्यंत सर्वांनाच कळून चुकलेली आहे. या विकास कामांच्या उद्घाटनाच्या दौऱ्यामुळे झालेला अप्रत्यक्ष जबरदस्त प्रचार हा मोदींच्या लोकसभा विजयाची गॅरंटी असल्याचे कदाचित मिलिंद देवरा यांना वाटत असावे, म्हणूनच त्यांनी त्यांच्या राजकीय अधिपतनाला कंटाळून नवीन राजकीय पुनर्जन्म करण्यासाठी काँग्रेसची साथ सोडून महायुतीतील शिंदे गटात सामील व्हायचे ठरवले असावे, असा राजकीय तज्ञांचा कयास आहे. दक्षिण मुंबई मतदार संघावर गेल्या वर्षभरापासून मराठी-गुजराती मतदारांच्या जोरावर भाजपने दावा ठोकलेला आहे. येणाऱ्या काळात देवरांना जरी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तरी, त्यांना कदाचित राज्यसभेवर संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच मिलिंद देवरा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाच्या गॅरंटीवर विश्वास असल्याची खात्री झाल्याची बाब प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून ‘राजकीय आत्महत्या’ करण्यापेक्षा ‘अच्छेदिन’ येण्यासाठी महायुतीत जाऊन ‘राजकीय पुनर्जन्म’ केलेला केव्हाही चांगला असे मिलींद देवरा यांना वाटत असावे. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुतीचे सरकार विविध विकास कामांची उद्घाटन करताना ज्या प्रकारे प्रचारयुक्त उद्घाटने करीत आहे, त्यावरून दिसून येते की येणाऱ्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविलेल्या भविष्याप्रमाणे आणखीही काही इतर राजकीय पक्षांची नेते किंवा आजी-माजी आमदार खासदार हे महायुतीत येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ईडीग्रस्तांना’ अच्छे दिन येण्याची ‘गॅरंटी’
ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे सरकार स्थापन होण्याच्या काही महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ED सारख्या लचांडांपासून दूर राहण्यासाठी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे विनंतीपत्र तेव्हा उद्धव ठाकरेंना लिहिलेलं होत.हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्मरण झालेलं आहे. तत्कालीन महाविकास आघाडीत असताना झोप उडालेले ईडीग्रस्त आमदार-खासदार आता शिंदे सरकारमध्ये असताना साखरझोप घेत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट दिसून येते. येणाऱ्या काही दिवसांतचं मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविलेले भाकीत आणि पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या गॅरंटीवर इतर राजकीय पक्षातून अनेक दिग्गज नेते हे भाजपात येण्यासाठी इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत आहे.