जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे ‘ग्राउंड लेव्हल’ चे अचूक विश्लेषण,कुठे झालाय दगाफटका ?
सुरेशदादा जैन यांचा करिष्मा फेल
जळगाव,दि-१५ मे – गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची रणधुमाळी आता संपलेली असून 13 मे रोजी झालेल्या मतदानानंतर आता विजयाचे आणि पराभवाचे गणित आखले जात आहे. जळगाव लोकसभेसाठी 58% तर रावेर लोकसभेसाठी 64% मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार करण पवार यांच्यातच खरी लढत झाल्याचे चित्र दिसून आलेले आहे. नवख्या करण पवार यांनी राजकीय परिस्थिती प्रतिकूल असताना भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना दिलेली जोरदार ‘फाईट’ भाजपच्या चिंतेत भर घालणारी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांची ताकद पाठीशी असताना प्रत्यक्षात झालेल्या मतदानानुसार स्मिता वाघ यांची धाकधूक वाढल्याचे बोलले जात आहे. एका मंत्र्यांनी ‘मीडियामेल न्यूज’ शी खाजगीत बोलताना सांगितलेले आहे की,मतदानाच्या चार दिवस आधी पर्यंत करण पवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने भाजपसह महायुतीच्या गोटात चिंता वाढलेली होती. मात्र ऐनवेळी शेवटच्या दोन-तीन दिवसात महायुतीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची झालेली बैठक आणि त्यानंतर सुरेशदादा जैन यांनी जाहीर केलेला पाठिंबा यामुळे हे संकट काहीअंशी टळल्याचे सांगितलेलं आहे. जर आणखी पंधरा दिवस आधी करण पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असती तर जळगाव मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता अशी शक्यता एका दिग्गज मंत्र्यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दोन्ही उमेदवार हे पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या चिंतेत नक्कीच भर पडल्याचे दिसून येत आहे.
सुरेशदादा जैन यांचा करिष्मा ‘फेल’
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला 6 दिवस बाकी असताना पूर्वाश्रमीचे शिवसेना उबाठाचे नेते असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मतदानाला तीन दिवस बाकी असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच ‘स्क्रिप्ट’ वाचन करून जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी मतदान करण्याचे आवाहन केलेले होते. मात्र सुरेशदादा जैन यांच्या आवाहनाला त्यांच्या समर्थक असलेल्या काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी न जुमानता शिवसेना उबाठाचे उमेदवार करण पवार यांच्याच विजयासाठी म्हणजेच मशालला मतदान करण्यासाठीच प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे सुरेशदादा जैन यांच्या आवाहनाचा प्रभाव भाजपच्या उमेदवारांसाठी फार काही फायदेशीर राहणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
चाळीसगावात सर्वात कमी मतदान
तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57% मतदान झालेलं आहे. येथील भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांनी गेल्या तीन वर्षात चाळीसगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांची जनतेने दखल घेतली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आ.मंगेश चव्हाण यांनी उमेदवार स्मिता वाघ यांची विजयाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतल्याचे बोलले जात होते.तर दुसरीकडे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार असताना केलेल्या विकास कामांची सुद्धा जनतेने दखल घेतली नसल्याचे चित्र चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात दिसून आलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी करण पवार यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतलेली होती. या चाळीसगाव मतदारसंघातून कमी मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते यावर येत्या विधानसभेतील गणित अवलंबून राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात माजी खासदार उन्मेश पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
पाचोर्यात भाजपकडून दगाफटक्याचा संशय ?
पाचोरा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याशी राजकीय वैर असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभेचे गणित लक्षात घेता उघडपणे मशालकडे लक्ष देण्याचे आवाहन जनतेला केलेले होते. काही दिवसांपूर्वी पाचोरा शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिलेली होती. मात्र त्याचवेळी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टाळलेले होते,त्याची कुठेतरी कुजबूज आणि नाराजी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होती असे बोलले जात आहे.
अमळनेरमध्ये भाजपकडूनच दगाफटक्याचा संशय ?
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार स्मिता वाघ यांचे ‘होम पीच’ असलेल्या अमळनेर तालुक्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या काही समर्थकांनी येत्या विधानसभेचे गणित लक्षात घेता उघडपणे मशालकडे लक्ष देण्याचे आवाहन जनतेला केलेले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री अनिल भाईदास पाटील यांनाच महायुतीच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता लक्षात घेता, माजी आमदार शिरीष चौधरी हे अमळनेर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने विधानसभेच्या रणनीतीनुसारच त्यांनी काम केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील एक कॅबिनेट मंत्री असलेले अनिल पाटील आणि आमदार राहिलेल्या स्मिता वाघ यांचे ‘होमपीच’ असल्यावर सुद्धा या ठिकाणी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचे विरुद्ध शिवसेना उबाठाचे उमेदवार करण पाटील-पवार यांनी तगडी लढत दिल्याचे बोलले जात आहे. हे एक प्रकारे अनिल भाईदास पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
पारोळ्यात आ.चिमणआबा पाटलांना धोक्याची घंटा
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उबाठाचे उमेदवार असलेले करण पवार यांचे ‘होमपीच’ असलेल्या पारोळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चिमणआबा पाटील यांच्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. उमेदवार करण पवार यांच्या सोबतीला त्यांचे काका माजी मंत्री सतीशअण्णा पाटील यांनीही खूप मेहनत घेऊन प्रचार केलेला असल्याचे बोलले जात आहे. करण पवार हे पूर्वी भाजपात असल्याने त्यांचे काही समर्थक असलेले भाजपचे कार्यकर्ते हे सुद्धा आता शिवसेना उबाठा गटात सामील झाल्यामुळे या ठिकाणी भाजपची ताकद कमी झालेली होती. या मतदारसंघात ‘जरांगे फॅक्टर’ सुद्धा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वतः विद्यमान आमदार चिमण आबा पाटील किंवा त्यांचे सुपुत्र अमोल चिमणराव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सन्नाटा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 53% मतदान झाल्याने विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या चिंतेत नक्कीच भर पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन टर्म पासून सुरेश भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले असून त्यांनी दिग्गज नेते सुरेशदादा जैन यांचा या ठिकाणी दोन वेळा पराभव केलेला आहे.असे असताना जळगाव शहर मतदारसंघात ‘अँटी इन्कमबन्सी’मुळे झालेले सर्वात कमी मतदान भाजपच्या चिंतेत भर घालणारे नक्कीच आहे. विशेष म्हणजे जळगाव महापालिकेत शिवसेना उबाठा गटाच्या जयश्री सुनिल महाजन या गेल्या टर्ममध्ये महापौर राहिलेल्या आहेत. त्यामुळे मतदारांची नाराजी नेमकी आमदारांवर आहे की महापौरांवर आहे, याबाबत आता विश्लेषकांचा काथ्याकूट सुरू झालेला आहे. येणाऱ्या विधानसभेत विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात जयश्री महाजन किंवा त्यांचे पती सुनील महाजन हे निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आहे. सुनील महाजन हे आता एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे पारडे जड
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्यातच खरी दुहेरी लढत झाल्याचे चित्र दिसून आलेले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे ‘होमपीच’ असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला खडसे कुटुंबाविरुद्ध पूर्वापार असलेली विरोधी भूमिका कायम ठेवलेली होती. मतदानाच्या शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे रक्षा खडसे यांना सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजगी जाहीरपणे दर्शवलेली दिसून आलेली आहे. मात्र नंतर नाराज कार्यकर्त्यांनी उघडपणे रक्षा खडसे यांचा प्रचार केल्याचे चित्र दिसून आलेले आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रमुख विरोधी उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी स्थानिक मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवलेली दिसून येत आहे. त्यांना या मतदारसंघातील निर्णायक असलेल्या मराठा मतदारांसह अल्पसंख्यांक मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांना ‘जरांगे फॅक्टर’चा सुद्धा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. श्रीराम पाटील यांना यावल-रावेर मुक्ताईनगर,मलकापूर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतदान झाल्याचे बोलले जात आहे. श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मिळालेला पाठिंबा हा ‘जरांगे फॅक्टर’ मुळे मिळालेला आहे की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यामुळे मिळालेला आहे याचे उत्तर 4 जून नंतर मिळणार आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे मुक्ताईनगर हे ‘होमपीच’ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून घेतलेली अनपेक्षित आघाडी हा त्यांच्यासाठी सुद्धा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथराव खडसे हे आता भाजपात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रचार केलेला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या रक्षा खडसे यांना चोपडा,भुसावल,जामनेर मतदार संघातून मोठी आघाडी मिळणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. याचाच अर्थ चोपडा हे शिवसेना तर भुसावळ आणि जामनेर विधानसभा मतदारसंघ हे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप साठी ‘सेफ झोन’ असल्याचे चित्र दिसून येत आहे.असे असले तरी रक्षा खडसे यांचे पारडे रावेर लोकसभा मतदारसंघात जड वाटत आहे. पहिल्यांदाच थेट लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत सलग दोन वेळा भाजपतर्फे खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांना चांगली लढत दिल्याचे बोलले जात आहे.