शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ८ :- भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र देफडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक बैठक पार पडलेली आहे. बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भिल्ल समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेचा लक्षांक वाढवून अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिलेल्या आहेत. तसेच भगवान वीर एकलव्य यांचे मंदिर तसेच पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ केली जाईल,असे आश्वासन यावेळी दिलेले आहे.