बोगस शिक्षक भरती प्रकरण, शिक्षण उपसंचालकांना पोलिसांनी केली अटक, ३०० कोटींच्या घोटाळ्याची शक्यता ? शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
जळगाव जिल्ह्यातील बॅक डेटेड बोगस शिक्षक भरतीप्रकरणी अनेकांवर कारवाईची टांगती तलवार

नागपूर दि- ११/०४/२५, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी वेतन अधिक्षक यांनी बनावट शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे याला दिनांक 9 एप्रिल रोजी राज्य शासनाने निलंबित केले आहे. 2019 पासून तब्बल 580 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी प्रदान केल्याचे सिद्ध झाले आहे. वाघमारेला निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनाही नागपूर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे. त्यांना मध्यरात्री नागपुरात आणण्यात आले. या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण समोर आलेले आहेत.या प्रकरणात आतापर्यंत आठ ते दहा शाळांमधील शेकडो शिक्षकांची बोगस भरती प्रकरणे समोर आलेली असून हा तब्बल ३०० कोटींच्या आसपासचा भरती घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी यापूर्वी तत्कालीन वेतन अधीक्षक शर्मा आणि नाशिक उपसंचालक कार्यालयातील लेखापाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अजून सुरूच आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रक्रियेतील काळाबाजार उघडकीस आणण्यासाठी आता पोलीस पुढे काय कार्यवाही करतात, याकडे शिक्षण क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागून आहे. कालच चाळीसगाव येथील एका नामांकित शाळेत नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी भेट देऊन झालेल्या भरती प्रक्रियेतील तब्बल १५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय कार्यवाही होते, याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. बॅक डेटेड बोगस शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या खाजगी पंटरांसह तयार केलेले मोठे रॅकेट लवकरच उघडकीस येण्याची शक्यता असून , बोगस भरती प्रकरणात शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अडकणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय ?
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले होते. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.