भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या रजा टॉवर चौकातील एका तरुणाला अटक

भुसावळ – रेल्वे स्थानकावर टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात रेल्वे पोलिसांचे ‘ऑपरेशन उपलब्ध’ मोहिम सुरू आहे. आरक्षण खिडकीजवळ एक व्यक्ती प्रवाशांना अवैधरित्या वाढीव दराने तिकीट विक्री करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता मिळाली होती. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसांनी शाकाहाराचा एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ झेलम एक्सप्रेसचे आरक्षित जागेचे तिकीट मिळून आले.
आर पी एफ चे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवडे सहाय्यक फौजदार दीपक कवडे, एफएसआय शिवानंद गीते यांच्या पथकाने सापळा रचून त्याच्या ताब्यातील टिकिटे जप्त केली होती. सदरील संशयित आरोपीने त्यांचे नाव आवेश शेख, (वय वर्षे 22) रा. रजा टावर चौक, भुसावळ असे असल्याचे सांगितले आहे. रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत त्याने सांगितले की सदरील झेलम गाडी क्रमांक 11078 च्या स्लीपर सीट साठी त्याने 670 रुपयांसाठी हे तिकीट खरेदी करून ते 330 रुपये अधिकचे कमिशन घेऊन संबंधित प्रवाशासाठी आरक्षित केल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून त्याच्या ताब्यातून एक हजार रुपये रोख जप्त करण्यात आलेले असून त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.