एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे निलंबित, ड्रग्स पेडलरशी संपर्क ठेवणे पडले महागात
आणखी एक कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव दि-01/05/2025, जिल्हा पोलिस दलात जबाबदार पदावर असताना कोणाशी संपर्कात असावे , याचे भान न ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबित करण्यात आले. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढलेले आहे. निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळ विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. या ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या संशयितांशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचे निलंबन होईल असे वाटत होते, मात्र त्यांच्यातील कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केली असता, काहीही संशयास्पद नसल्याचा दावा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी केला होता. त्यावेळी दत्ता पोटे यांची जळगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. ड्रग्स प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र पोलिस दलात काम करीत असताना कोणाशी संपर्कात असावे, याचे भान न ठेवल्याने पोटे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात अजूनही काही पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून त्याबाबत आता भुसावळ चे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याकडून अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.