कौन बनेगा पालकमंत्री ? मंत्री ना.संजय सावकारे ९ आमदारांना वरचढ ठरून बनले ‘बाजीगर’,इनसाईड स्टोरी
नागपूर ,दि-१८/१२/२४ , नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आता कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असून आज दुपारी बारा वाजेपर्यंत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे. शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहे.
जळगाव जिल्ह्याची उत्सुकता शिगेला ?
आधीच केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालेल्या जळगाव जिल्ह्याला यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र कोणाला कोणत्या खात्याचे मंत्रीपद मिळणार ? आणि जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ? याचीच चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री गिरीश महाजन यांना नेहमीप्रमाणे सर्वात वजनदार खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या खालोखाल मंत्री संजय सावकारे यांना सामाजिक न्याय किंवा ऊर्जा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गुलाबराव पाटील यांना पुन्हा त्याच पाणीपुरवठा खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागांवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन किंवा मंत्री संजय सावकारे यांच्याकडे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपची वाटचाल आता यशस्वीतेकडे चाललेली असून तीनही मंत्री हे रावेर लोकसभा मतदार संघातील असल्याने रावेर लोकसभा क्षेत्राचे राजकीय वजन वाढलेले आहे.जिल्ह्यात आता भाजपने दोन कॅबिनेट मंत्री दिल्याने भाजपचे दोन सत्ता केंद्र स्थापन झालेले असल्याने आणि गिरीश महाजन यांचा राज्यातील कामाचा व्याप बघता जळगाव जिल्ह्यातील आगामी निवडणुकांची जबाबदारी ही आता मंत्री संजय सावकारे यांच्या खांद्यावर देण्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांनी जिल्ह्यात अजून तरी कोणतीही खास छाप पाडलेली दिसून आलेली नसल्याने संयमी आणि अभ्यासू असलेल्या मागासवर्गीय नवीन नेतृत्वाला संधी देऊन उत्तर महाराष्ट्रात नवीन सत्ताकेंद्र निर्माण केलेलं आहे.तसेच इतर जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सुद्धा तिघांकडे येणारच असल्याची माहिती समोर आलेली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वीरित्या सांभाळलेले असून २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी त्यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी या वरील तीनही नेत्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविण्याचा अनुभव असल्याने आता पालकमंत्रीपद नेमकी कोणाला मिळते ? याकडे आज जळगाव जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेले आहे.
नऊ आमदारांना वरचढ ठरले ना.सावकारे
भाजपने एकूण १३२ जागा जिंकलेल्या असून त्यापैकी दहा जागा या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांच्या आहेत. यापैकी सुरेश खाडे हे यापूर्वी मंत्री राहिलेले असून एकूण नऊ आमदारांना बाजूला सारून भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी चार वेळा निवडून आलेल्या तरूण उच्चशिक्षित ,संयमी,अभ्यासू,विवेकी स्वभाव,आणि विकास कामांची छाप पाडणाऱ्या ना.संजय सावकारे यांना संधी देऊन मागासवर्गीय समाजाचा सन्मान केल्याची भावना आता निर्माण झालेली आहे. मंत्री संजय सावकारेंमुळे जिल्ह्यात दुसरे पावर सेंटर निर्माण झालेले असून ते आता त्यांच्या संधीचं कसं सोनं करतात ,याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.