गुजरात लॉबीने मराठी माणसामार्फत शिवसेना संपवली – खा. संजय राऊतांचा घणाघात
मुंबई दि-10, दिल्लीत बसलेल्या गुजरात लॉबीने मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना आज एका मराठी माणसामार्फतच संपवली अशी तिखट प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी निकालानंतर दिलेली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सायंकाळी साडेचार वाजेपासून सुरू केलेल्या महानिकाल वाचल्यानंतर लागलेल्या धक्कादायक निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडले.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची औकात काय ? अशा तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिलेली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कोणी संपवू शकत नाही गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिवसेना संपवण्याची जी योजना होती. त्याचाच हा एक भाग आहे परंतु शिवसेना कधी संपणार नसून आम्ही या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ तिथे आम्हाला नैसर्गिक न्यायाची नक्कीच अपेक्षा आहे. आणि तो मिळणारच असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. तसेच कोण एकनाथ शिंदे कोण भरत भोगावले यांना आम्ही ओळखत नाही असे कित्येक आले आणि गेले शिवसेना तसेच उभी आहे. आणि यापुढेही जोमाने उभी राहील आणि आम्ही शेवटपर्यंत या अन्यायाविरोधात लढत राहू, अन्यायाविरोधात सतत लढणे हा शिवसैनिकांचा आणि मराठी माणसांचा इतिहास आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या 2018 च्या पक्षघटनेसंदर्भातील तांत्रिक प्रश्नांच्या उत्तरावर कोणतीही प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेली नाही.