मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर, अचानक होणाऱ्या घडामोडींकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून
पालकमंत्री पदाबाबत घोषणा होण्याची शक्यता
जळगाव -दिनांक -२६/१२/२०२४ ,राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून या निमित्ताने ते जिल्ह्यातील काही प्रमुख वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करणार आहेत. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झालेल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकतात ? याबाबतचे अजून कोणतेही नियोजन जिल्हा प्रशासनाकडून समोर आलेले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन होणार असून तेथून ते एका लोकप्रतिनिधींच्या घरी होणाऱ्या खाजगी समारंभाला भेट देणार असून त्यानंतर ते जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावती भेट घेऊन चर्चा विनिमय करणार असल्याची प्राथमिक माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच जळगाव जिल्हा दौरा असून सत्ता स्थापन झाल्या नंतर एक महिना उलटल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आणि विकास योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय घोषणा करतात ,याकडे जळगाव जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन , मंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित राहण्याची असल्याची माहिती समोर आलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्गासह शहरांमधील अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे वारंवार होणारे गंभीर अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप जीवांचे बळी तसेच जिल्ह्यातील सट्टाव्यावसायिकांसोबत होणारे सशस्त्र दरोड्यासह लुटमारीचे प्रकार समोर आलेले असून याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय आदेश देतात, याकडे जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे.