भुसावळ-देवळाली मेमू चालू गाडीचे इंजिन निकामी झाल्याने गाडीतील वीजपुरवठा 2.30 तास खंडित, रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाड्यांचा खोळंबा
भुसावळ दि 12 सप्टेंबर : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे.
भुसावळ देवळाली गाडी क्रमांक ११११४ ही गाडी भुसावळ स्थानकातून सुटल्यावर तरसोद जवळ सुरळीत चालू असलेलं इंजिन अचानक बंद पडल्याने ही गाडी एकाच ठिकाणी तब्बल 2.30 तास खोळंबली होती. अडीच तास उशिरा धावत असल्याने या गाडीच्या मागून येणाऱ्या पाच ते सहा एक्सप्रेस गाड्या खंडवा ते भुसावळ आणि शेगाव ते भुसावळ दरम्यान खोळंबल्या होत्या. भुसावळ हून आलेल्या रेल्वेच्या अभियंत्यांनी गाडी बंद पडलेल्या ठिकाणी गाडीच्या इंजिनाचा झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने शेवटी जळगाव स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीचे इंजिन बोलावून त्याद्वारे शेवटी ही गाडी जळगाव स्थानकात थांबविण्यात आली आहे.अशी माहिती जळगाव रेल्वे पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या गाडीचे इंजिन बंद पडताच सर्व गाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बंद गाडीत तब्बल अडीच तास घामाघूम झाल्याने प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सायंकाळी 5.40 भुसावळ स्थानकातून सुटलेली ही गाडी आता केव्हा सुरू होईल याची काहीही माहिती स्पष्टपणे प्रवाशांना दिली जात नसल्याने प्रवाशी गांगरले होते.
याच क्षणी मुंबई कडे जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांचा दोन तास खोळंबा झाला.
तरसोद ते जळगाव संपूर्ण गाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता.