मंत्री संजय सावकारेंचे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढले ! आता जळगाव किंवा धुळ्याचे मिळण्याची शक्यता ?

मुंबई – महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर मंत्री संजय सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन करण्यात आले असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे. मात्र त्यांची आता जळगावच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश
सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढलेला आहे. या निर्णयामागे भंडाऱ्यात संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक याव्यतिरिक्त जिल्ह्यात फारसे फिरकत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आम्हाला स्थानिक पालकमंत्री हवा, अशी मागणी वारंवार केली जात होती. खरं तर सावकारे हे त्यांच्या मूळ जळगाव जिल्ह्यातून यायचे ,त्यामुळे त्यांना भंडारा ये-जा साठी खूपच दूर होते. त्यामुळेच की काय , संजय सावकारे यांचे डिमोशन करुन त्यांच्याजागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले असावे, असा अंदाज आहे. पंकज भोयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने पंकज भोयर यांच्यावर भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे













