Advertisement
आरोग्यक्राईम/कोर्टजळगाव

यावल आगाराची बस तापी पुलाजवळ अचानक पडली बंद ; चाकाच्या एक्सलचे नट-बोल्ट ढिले होऊन निघाल्याने 40 प्रवाशांच्या जीवाशी खेळ !

अनेकदा भररस्त्यातच बसेस होतात नादुरुस्त

भुसावळ, दि. २५ डिसेंबर २०२५: यावल आगाराची बस क्रमांक MH14 BT 1647 ही भुसावळ येथून यावलकडे जात असताना तापी पुलाच्या अगदी जवळच अकलूद गावाच्या दिशेने यावल कडे जात असताना अचानक इंजिन बंद पडल्याने भररस्त्यात थांबली. या घटनेने बस मधील ३८ प्रवाशांसह चालक आणि वाहक अशा एकूण ४० जणांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, यावल आगाराच्या देखभाल विभागाच्या निष्काळजीपणावरून जोरदार टीका होत आहे.
दरम्यान,काल दि-24/12/25 रोजी सायंकाळी सात वाजेच्या भुसावळ बस स्थानकावरून यावल कडे निघालेली ही बस नियमित मार्गाने यावलकडे जात होती. तापी पुलाजवळ पोहोचताच बसचे इंजिन अचानक बंद पडले. चालकाने प्रयत्न करूनही बस सुरू होत नसल्याने सर्व प्रवासी खाली उतरले. तेव्हा बसच्या मागील चाकाचे एक्सल तपासले असता, त्याचे सर्व नट आणि बोल्ट ढिले झालेले आणि बाहेर निघालेले दिसून आले. ही बाब पाहून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि त्यांचा थरकाप उडाला. “आमचा जीव कसा वाचला हे देव जाणे,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. या घटनेमुळे बसच्या देखभाल दुरुस्ती व यांत्रिक स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बसमधील प्रवाशांच्या मते, ही घटना यावल आगाराच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या अभावामुळे घडली आहे. “बसच्या एक्सलचे नट-बोल्ट ढिले होणे हे सामान्य बाब नाही. हे स्पष्टपणे निष्काळजीपणाचे लक्षण आहे,” असे एका महिला प्रवाशाने सांगितले आहे. यावल आगाराच्या बस भररस्त्यात बंद पडण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “नेहमीच बस बंद पडतात, तरीही आगार प्रशासन सुधारणा करत नाही,” अशी खंत एका नियमित प्रवाशाने व्यक्त केली.
या घटनेनंतर प्रवाशांनी यावल आगाराच्या यांत्रिक विभाग आणि देखभाल व दुरुस्ती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हा फक्त किरकोळ अपघात नव्हे, तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे. संबंधितांना तातडीने निलंबित करावे आणि बसच्या सर्व फ्लीटची तपासणी करावी,” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. सदरील प्रकरणात राज्य परिवहन महामंडळाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसच्या नियमित देखभालीला प्राधान्य देणे आवश्यक असून,अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असे संतापजनक मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button